Police Transfer: बारामतीत पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या; नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 01:33 PM2024-09-01T13:33:25+5:302024-09-01T13:34:37+5:30
अवघ्या काही महिन्यांतच पोलीस अधिकाऱ्यांच्या झालेल्या अचानक बदल्यांमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे
सांगवी : बारामती तालुक्यातील शहर पोलीस ठाणे, ग्रामीण पोलीस स्टेशन व माळेगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या करण्यात आल्या आहेत. बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान या दोन्ही पोलीस निरीक्षकांच्या पदभार स्वीकारल्या नंतर अवघ्या चार ते पाच महिन्यांत तडकाफडकी बदल्या झाल्या आहेत. तसेच माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन नम यांची देखील चार ते पाच महिन्यांच्या आतच सातारा येथे बदली करण्यात आली आहॆ. अवघ्या काही महिन्यांतच पोलीस अधिकाऱ्यांच्या झालेल्या अचानक बदल्यांमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहॆ.
पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्याशी बातचीत केली असता विनंती वरुन आपली पुणे कंट्रोलला बदली करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर पोलीस निरीक्षक घोळवे यांनी पाच ते सहा महिन्यांत बारामती शहर पोलीस ठाण्याचा पदभार सांभाळून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहॆ. तर ग्रामीण पोलीस ठाण्याचे विजयसिंह चौहान यांची देखील विनंती वरुन पुणे कंट्रोलला बदली झाल्याचे सांगितले. तर माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन नम यांनी देखील चार ते पाच महिन्यांत चांगली कामगिरी बजावली. सहायक पोलीस निरीक्षक नम यांचा पुणे ग्रामीण विभागातील चार वर्षांचा कार्यकाल संपल्यामुळे त्यांची सातारा येथे बदली झाली आहॆ.
संतोष घोळवे यांच्या जागेवर शहर पोलीस ठाण्यात विलास नाळे यांची बदली झाली आहॆ. तर ग्रामीण पोलीस ठाण्यात गडचिरोली येथील विश्वास जाधव यांची बदली झाली आहॆ. तर माळेगाव पोलीस ठाण्यात आर्थिक गुन्हे शाखा पुणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांची बदली झाली आहे.