रस्त्यावरचा आठवडेबाजार हटेना
By admin | Published: March 31, 2017 02:30 AM2017-03-31T02:30:01+5:302017-03-31T02:30:01+5:30
महामार्गालगत बसणाऱ्या विक्रेत्यांमुळे व पार्किंग केलेल्या वाहनांमुळे वाहतूककोंडी कायम आहे. पोलीस विक्रेते व वाहनांवर कारवाईचा फक्त फार्सच
कोरेगाव भीमा : येथील महामार्गालगत बसणाऱ्या विक्रेत्यांमुळे व पार्किंग केलेल्या वाहनांमुळे वाहतूककोंडी कायम आहे. पोलीस विक्रेते व वाहनांवर कारवाईचा फक्त फार्सच करीत आहे. काही महिन्यांपूर्वी एसटी महामंडळाच्या जागेत बंद झालेला बाजार पुन्हा सुरु झाल्याने गेल्यावर्षी रस्त्यावरचा आठवडे बाजार स्तलांतरित करण्याची जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस व एसटी महामंडळ यांनी सुरु केलेली मोहीम बंद पडल्याने वाहतूककोंडी पूर्ववत झाली असल्याचे चित्र आहे.
कोरेगाव भीमा येथील बाजार हटविण्यासंदर्भात गतवर्षी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तहसीलदार, गटविकास अधिकारी व पोलीस प्रशासन यांनी स्थानिक ग्रामपंचायतीस सांगितले होते. मात्र ग्रामपंचायतीने बाजार एसटी महामंडळाच्या जागेतून हलवून रस्त्याच्या बाजूलाच बसविल्याने उलट वाहतूककोंडीस निमंत्रणच दिले आहे. १३ एप्रिल २०१६ रोजी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी कोरेगाव भीमा ग्रामपंचातीस पत्र दिले होते, की बाजार स्मशानभूमीत हलवून रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांवर व पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार बहुतांश विक्रेते रस्त्याच्या बाजूला बसल्याने वाहतूककोंडी काहीप्रमाणात सुटली होती. मात्र त्यानंतर पोलीस निरीक्षक व गटविकास अधिकारी यांची बदली झाल्यानंतर व जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही वाहतूक समस्येसंदर्भात बैठका बंद पडल्याने पुणे-नगर महामार्गावरील वाहतूककोंडीचा विषय सर्वच शासकीय अधिकाऱ्यांनी कानामागे टाकल्याने पुन्हा वाहतूककोंडीस सुरुवात झाली आहे. त्यात आता पुन्हा भाजीविक्रेते रस्त्यावरच दुकान थाटू लागले आहेत, तर पार्किंगही मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरच उभी केल्याने वाहतूककोंडीस कारणीभूत ठरत आहे. यात भर म्हणून की काय दुकाने, फळगाड्या एसटी महामंडळाच्या जागेत पुन्हा थाटू लागल्याने वाहतूककोंडीत वाढ झाली आहे.
तहसीलदार राजेंद्र पोळ यांच्याकडे आठवडे बाजार संदर्भात चौकशी केली असता त्यांनी, अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे दिला असल्याचे सांगितले.
तर पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, गटविकास अधिकारी संजय जठार यांना आठवडे बाजार स्थलांतरासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी ‘आठवडे बाजार स्थलांतराचा विषयच आपल्याला माहीत नसल्याचे सांगितले, चौकशी करुन निर्णय घेणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
बाजार स्थलांतराची मोहीम थंडावली
कोरेगाव भीमा रस्त्यालगत असणारा आठवडे बाजार स्थलांतरित करण्याची गतवर्षी जोरदार असलेली मोहीम प्रशासनाकडून थंडावली आहे. त्यामुळे आठवडे बाजार रस्त्यावरच भरत असल्याने वाहतूककोंडीत मोठी वाढ झाली असल्याने पुणे-नगर महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
एसटी महामंडळाच्या जागेत सुरू झाला
पुन्हा बाजार
येथील एसटी महामंडळाच्या जागेतील आठवडे बाजार गतवर्षी तहसीलदार, पोलीस व गटविकास अधिकारी यांना हटविण्यात यश आले होते. मात्र कारवाईत सातत्य नसल्याने पुन्हा बाजार एसटी महामंडळाच्या जागेत भरू लागल्याने वाहतूक समस्येत पुन्हा वाढ झाली आहे. प्रशासनाने मात्र डोळ्यांवर पट्टी बांधली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
रस्त्यावरील आठवडेबाजार हटविण्याची जबाबदारी कोणाची...?
रस्त्यावरील आठवडे बाजारामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे हे, एक अधिकारी व सहा कर्मचारी गुरुवार दिवशी वाहतूक सुरळीत करण्यासाठी देत असतात. मात्र तहसीलदार, गटविकास अधिकारी हे कोणतीच कारवाई करत नसल्याने बाजार हटविण्याची जबाबदारी नक्की कोणाची? हा सवाल उपस्थित होत आहे.