शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील घरांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 04:32 AM2018-12-11T04:32:52+5:302018-12-11T04:33:16+5:30
१५९ घरे, २७ दुकानांना नोटिसा; पोलीस बंदोबस्तात होणार कारवाई
पुणे : शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वेच्या जागेतील अनधिकृत घरे व दुकानांवर हातोडा पडणार आहे. या भागातील १५९ घरे व २७ दुकानांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, येत्या शनिवारी हे अतिक्रमण हटविले जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. स्थानिकांचा विरोध लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून पोलीस, आरपीएफ व जीआरपीच्या मोठ्या फौजफाट्यासह कारवाईची तयारी केली आहे.
मध्य रेल्वेच्या वतीने शिवाजीनगर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यामध्ये फलाटांचाही विस्तार प्रस्तावित आहे. तसेच प्रवाशांसाठी इतर सोयी-सुविधाही उभारण्यात येणार आहेत. मात्र, स्थानक परिसरातील रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण झालेले आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी रेल्वेकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वी अनेकदा स्थानिकांना जागा रिकामी करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या. पण अद्याप त्यात यश आलेले नाही. आता रेल्वे प्रशासनाकडून हे अतिक्रमण हटविण्यासाठी ठोस भूमिका घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनच्या (डाऊन) बाजूकडील रेल्वेच्या जागेत एकूण १२९ घरे आहेत. त्यातील ६६ घरे पुणे स्टेशनच्या दिशेला असून उर्वरित घरे खडकीच्या दिशेला आहेत. तर मुख्य फलाट क्रमांक एक (अप)च्या बाहेर एकूण २७ दुकाने आहेत, तर खडकीच्या बाजूला ३० घरे आहेत. उच्च न्यायालयाने २००३मध्ये शिवाजीनगर स्टेशनवरील फलाटलगतच्या १० मीटर परिसरात अतिक्रमण असू नये, असे आदेश दिले होते. त्यानुसार या ३० घरांतील कुटुंबीयांचे महापालिकेने इतरत्र पुनर्वसनही केले. पण अद्यापही त्यांनी ही जागा सोडलेली नाही. एकूण २७ दुकानांपैकी १७ दुकानांना काही वर्षांपूर्वी रेल्वेने भाडेतत्त्वावर प्रत्येकी ४ चौरस मीटर जागा दिली आहे. तर १० दुकाने अनधिकृत आहेत. जागा दिलेल्या दुकानचालकांनी जादा जमीन ताब्यात घेतली आहे. जागा देताना काही अटी घालण्यात आल्या होत्या. त्यानुसार जागा सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाºयांनी दिली.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून एकाच वेळी १८६ घरे व दुकानांचे अतिक्रमण हटविण्याची मोठी कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी महिनाभरापूर्वी जागा रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी प्रत्येक घरावर नोटीस लावण्यात आली आहे. त्यानुसार रेल्वेकडून दि. १५ डिसेंबरला कारवाई केली जाणार आहे.
या कारवाईला स्थानिक नागरिकांकडून मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. पण त्याला न जुमानण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पुणे पोलीस, जीआरपी, आरपीएफचा मोठा फौजफाटा यादिवशी तैनात असणार आहे.
रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटविणे, ही प्राथमिकता आहे. हे अतिक्रमण काढण्याचा रेल्वेला अधिकार आहे. त्यानुसार तयारी करण्यात आली आहे. सर्व १८६ जणांना घरे व दुकाने रिकामी करण्याची नोटीस दिली आहे. कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी कारवाईपूर्वी घर-दुकानातील सामान हलवावे, असे त्यांना आवाहन करण्यात आले आहे. या कारवाईची तयारी पूर्ण झाली आहे.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग, मध्य रेल्वे