हॅट्स ऑफ! महिलेची जबरदस्त समयसूचकता; पतीची खालावलेली ऑक्सिजन पातळी 'एसी'मुळे वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 09:43 PM2021-04-29T21:43:18+5:302021-04-29T21:47:55+5:30
कोरोनाबाधित पतीची खालावलेली ऑक्सिजन पातळी अशी
पिंपरी : कोरोनाने थैमान घातले असताना रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यास नातेवाईक घाबरून जातात. मात्र, चिंचवड येथील एका डॉक्टरने मध्यरात्री पतीची ऑक्सिजन पातळी ८६ झाली असताना समयसूचकता ठेवत एसीचा ब्लोअरच उपयोग करून ९४ वर ऑक्सिजन पातळी आणली.
ही घटना आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवडगावातील. कोरोनाचा विळखा वाढत असल्याने हॉस्पिटलमध्ये बेड मिळणे कठीण झाले आहे. सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या नागरिकांना होम क्वारंटाइन व्हावे लागत आहे.मात्र, रुग्णाची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यानंतर नातेवाईकांची तारांबळ उडत असते. मात्र, समयसूचकता आणि सामान्य ज्ञान, वैद्यकीय क्षेत्राविषयी माहिती असल्याने अशावेळी रुग्णांचा धोका कमी होऊ शकतो. अशीच घटना चिंचवडला घडली. हा संपूर्ण घटनेचा उलगडा डॉ. दीपिका राव यांनी स्वतः केला आहे.
डॉ.दीपिका म्हणाल्या, त्यांचे पती सुहास राव यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. दोन दिवस उपचार केल्यानंतर रात्री अचानक दोन वाजेच्या सुमारास त्यांना श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला आणि ऑक्सिजनची पातळी तपासल्यानंतर ती ८७ पर्यंतखाली आल्याचं समजलं. इतक्या रात्री तातडीने बेड उपलब्ध करणं अशक्य होतं आणि अशा परिस्थितीत पतीच्या जीवितासाठी धोका निर्माण होऊ शकणार होता. त्यामुळे डॉक्टर असल्याने एसीच्या हवेच्या दाबाने ऑक्सिजन देऊन ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी मदत केली.
‘‘रात्री पतीची ऑक्सिजन पातळी कमी झाली. त्यामुळे घरात असणाऱ्या एसीमधील हवेचा वापर केला. एसीच्या हवेत २१ टक्के ऑक्सिजन असतो. त्यामुळे रात्री एसीचा ब्लोअर सुहास यांच्या तोंडासमोर आणला आणि एसीची हवा त्याला शरीरात घ्यायच्या सूचना दिल्या. साधारण २ ते ३ मिनिटे हा प्रयोग केल्यानंतर त्यांचा ऑक्सिजन पुन्हा पूर्ववत होऊन ९२ वर येऊन स्थिरावला"; असेेेही राव म्हणाल्या.