वडापुरी परिसरातील शेतकरी हवालदिल
By Admin | Published: April 22, 2016 01:05 AM2016-04-22T01:05:13+5:302016-04-22T01:05:13+5:30
परिसरात पडलेल्या भीषण दुष्काळाचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पाण्यासह जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावण्यास सुरुवात झाली आहे.
वडापुरी : परिसरात पडलेल्या भीषण दुष्काळाचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
पाण्यासह जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावण्यास सुरुवात झाली आहे. या वर्षीच्या हंगामामध्ये पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे पिके हाती लागली नसल्याने जनावरांना लागणारा चारा कमी प्रमाणात निघाल्याने सध्या वडापुरी अवसरी काटी पंधारवाडी या भागातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. दुसऱ्या तालुक्यातून जनावरांना चारा आणून घालण्याची वेळ शेतकरी वर्गाला आली असल्याचे पाहावयास मिळत आहे.
वडापुरी परिसरासह तालुक्यात पावसाने गेली चार ते पाच वर्षे झाली. दगा दिल्यामुळे यंदा कमी प्रमाणात ज्वारी, मका, कडवळ याचे कमी प्रमाणात उत्पन्न निघाल्याने कमी प्रमाणात चारा निघाला. परंतु, निघालेला चारासुद्धा आत्ता शिल्लक राहिला नसल्याने चाऱ्याची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे दुभत्या गाईंना जगविण्यासाठी दुसऱ्या तालुक्यातून वाहनाने चारा आणावा लागत असल्याचे चित्र आहे. पडलेल्या भीषण दुष्काळामुळे जमिनीतील पाण्याची खोलवर गेलेली पातळी गेली आहे. सध्या जनावरांना पोटभर चारा मिळत नसल्याने गुरांचे पोट व पाट एक झाल्याचे सध्या चित्र या भागात पाहावयास मिळत आहे. पाच वर्षांपासून सलग पडलेल्या भीषण दुष्काळामुळे भयंकर परस्थिती निर्माण झाली आहे. जर आज ही परिस्थिती असेल तर पावसाळ्यापर्यंत काय परिस्थिती असेल, यामुळे सध्या दुष्काळाची तीव्रता वाढत चालली आहे.
> हाताला काम, जनावरांना चारापाणी द्या
सुपे : बारामती जिरायती भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दुष्काळी दौरा काढला. या वेळी गावोगावच्या ग्रामस्थांनी प्रामुख्याने वाढीव पाणी, जनावरांना चारा व पाणी तसेच हाताला काम देण्याची मागणी केली.
सुपेसह जिरायती पट्ट्यातील बोरकरवाडी, वढाणे, कुतवळवाडी, भोंडवेवाडी, पानसरेवाडी, काळखैरेवाडी, चांदगुडेवाडी, नारोळी, कोळोली आणि बाबुर्डी आदी ठिकाणच्या जिरायती भागाचा दुष्काळी दौरा बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला. पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, ग्रामस्थांच्या हाताला काम देण्याची मागणी तसेच जलसंधारण व ओढा खोलीकरण आदी कामांचा पाढाच ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांसमोर मांडला.
तालुकाध्यक्ष संभाजी होळकर म्हणाले की, अद्याप तरी सरकारच्या माध्यमातून दुष्काळातील कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दुष्काळी दौरा काढण्यात आला. या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती होळकर यांनी दिली. या वेळी सतीश खोमणे, करण खलाटे, विक्रम भोसले, शंकरराव चांदगुडे, दीपक मलगुडे, सतीश तावरे, दत्तात्रय कुतवळ उपस्थित होते.