शेवटच्या सात महिन्यांत हौस पूर्ण करून घ्या - हर्षवर्धन पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 12:27 AM2018-08-12T00:27:36+5:302018-08-12T00:28:06+5:30
दुसऱ्याने केलेल्या कामांचे फुकटचे श्रेय घेण्यासाठी नारळ फोडून शेवटच्या सात महिन्यांत हौस पूर्ण करून घ्या, असा उपरोधित टोला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार भरणे यांचे नाव न घेता लगावला.
बावडा - दुसऱ्याने केलेल्या कामांचे फुकटचे श्रेय घेण्यासाठी नारळ फोडून शेवटच्या सात महिन्यांत हौस पूर्ण करून घ्या, असा उपरोधित टोला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार भरणे यांचे नाव न घेता लगावला.
लाखेवाडी (ता. इंदापूर) येथे आज विविध विकासकामांचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष नाना शेंडे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य माऊली चवरे, जि.प. सदस्या रत्नप्रभादेवी पाटील, चित्रलेखा ढोले, नीरा-भीमाचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, उदयसिंह पाटील, अॅड. अनिल पाटील आदी उपस्थित होते. पाटील यांनी यावेळी आमदार भरणे यांच्यावर टीका करताना सन २०१४ पासून लोकप्रतिनिधीने जेवढे विकासकामांचे नारळ फोडले, त्यापैकी एकतरी काम पूर्ण झाले का, असा सवाल केला. तालुक्याच्या विकास कामांसाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच, लाखेवाडी गावात श्रीमंत ढोले व त्यांचे बंधू दिलीप ढोले यांच्या योगदानाचेही कौतुक केले.
जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर झालेल्या लाखेवाडी-चाकाटी या रस्त्यास ३५ लाख, रत्नप्रभादेवी पाटील यांच्या जिल्हा परिषद निधीतून ज्योतिबा मंदिर सभामंडप ५ लाख, खारा ओढा रस्त्यासाठी ५ लाख मंजूर झाले असून, या कामांचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले. तसेच, भवानी माता गड विकास प्रतिष्ठानने गावात ३० हजार वृक्षलागवडीचा संकल्प केला असून, त्याअंतर्गत नागरिकांना घरटी पाच रोपांचे वाटपही पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक भाषणात माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी आमदार भरणे यांच्या अडवणुकीच्या धोरणावर टीका केली. लाखेवाडी गाव स्मार्ट व ग्रीन करण्याचा संकल्प केल्याचे सांगितले.
भाजपा शत्रू नाही : पाटील
कार्यक्रमात बोलताना ढोले म्हणाले की, भाजपा हा आमचा राजकीय शत्रू असताना गावच्या विकासकामात सातत्याने सहकार्य देतो. यावर मध्येच हस्तक्षेप करीत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपा आपला शत्रू नाही, दुसरेच शत्रू आहेत असे उच्चारताच हशा पिकला.
आगामी आमदार भाजपाचाच
भाजपाचे या सभेत गोडवे गाऊन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला पाठिंबा मिळण्याची आशा व्यक्त करण्यात आली. त्यावर बोलताना जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य माऊली चवरे यांनी इंदापूरचा आगामी आमदार भाजपाचाच असेल. मग, तो कोणाच्याही रूपाने होईल, असे उद्गार काढताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.