सदस्य कधी देणार लेखाजोखा?
By admin | Published: February 20, 2017 02:11 AM2017-02-20T02:11:33+5:302017-02-20T02:11:33+5:30
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या दोन वर्षांपूर्वी (११ जानेवारी २०१५) झालेल्या निवडणुकीतील विजयी उमेदवार दिलेल्या आश्वसनांची पूर्ती
देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या दोन वर्षांपूर्वी (११ जानेवारी २०१५) झालेल्या निवडणुकीतील विजयी उमेदवार दिलेल्या आश्वसनांची पूर्ती आणि विकासकामांचा लेखाजोखा कधी देणार याची प्रतीक्षा नागरिकांना आहे.
सदस्य निवडीची अधिसूचना केंद्र सरकारकडून १८ फेब्रुवारी २०१५ ला जाहीर झाली होती. त्यानुसार बोर्ड प्रशासनाकडून २६ फेब्रुवारी २०१५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत निवडून आलेल्या सात सदस्यांसह लष्करी सदस्यांचा शपथविधी झाला होता. सर्व सदस्यांचा दोन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला असल्याने त्यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार या कार्यकालात केलेल्या विकासकामांचा विस्तृत लेखाजोखा संबंधित नागरिकांना देणे क्रमप्राप्त आहे. नागरिकांनाही लेखाजोख्याची प्रतीक्षा आहे.
बोर्डाकडून सदस्यांच्या पहिल्या वर्षाच्या कार्यकाळात २६ फेब्रुवारी २०१५ व १२ फेब्रुवारी २०१६ रोजी घेण्यात आलेल्या विशेष बैठकींसह २५ मार्च २०१५, २६ मे २०१५, २ जुलै २०१५, २७ आॅगष्ट २०१५, ३ डिसेंबर २०१५ अशा सात साधारण मासिक बैठका झाल्या. द
ुसऱ्या वर्षात आजतागायत विशेष बैठकीसह दहा फेब्रुवारी २०१६ ,२२ जून २०१६, २५जुलै २०१६, सहा आॅक्टोबर २०१६, १८ नोव्हेंबर २०१६,१७ डिसेंबर २०१६ व ३१ जानेवारी २०१७ अशा एकूण सात बैठका झाल्या आहेत. पहिल्या वर्षात सीबीआय तपासणी त्यानंतर दुसऱ्या वर्षात पहिले सहा महिने पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी नसल्याने
तसेच काही महिने विविध विकासकामांच्या निविदा भरण्यास ठेकेदार प्रतिसाद देत नसल्याने विकासकामे रखडल्याचे दिसत होते. मात्र,गेल्या काही दिवसांत ठेकेदारांनी निविदा भरल्याने रस्ते सुधारणा व डांबरीकरणाची कामे सुरु झाल्याचे दिसत आहे. गटारी दुरुस्ती व सुधारणा कामेही सुरु झालेली
आहेत.
मात्र, बोर्ड प्रशासनाकडून कोणत्या भागात कोणती कामे सुरु आहेत, हे नागरिकांना माहित होत नाही. बोर्डाच्या सातही वॉर्डांत सुरु असलेली कामे, कामासाठी निविदा मंजूर रक्कम, काम करणाऱ्या ठेकेदाराचे नाव, कामाची मुदत, कामाचे आदेश आदी माहिती प्रसिद्ध करणे गरजेचे असतानाही पूर्वीप्रमाणे सर्व माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जात नाही. त्यामुळे कामाचे आदेश आदी सविस्तर माहिती नागरिकांच्या माहितीसाठी सूचनाफलक अगर संकेतस्थळावर प्रसिद्ध करायला हवी. जेणेकरून विकासकामांबाबत सर्वांना माहिती होऊ शकेल.
बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार सुरुवातीला काही महिने अर्थ समितीच्या बैठका झाल्यांनतर पुन्हा बैठका संपन्न झाल्याचे दिसत नाही. या व्यतिरिक्त नागरी, शिक्षण, महिला व बालकल्याण तसेच आरोग्य समित्यांची स्थापना झाल्यांनतर प्रशासनाकडून पहिल्या वर्षभरात एक-एकच बैठक घेण्यात आलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध समित्यांच्या बैठका घेण्याबाबत संबंधित समिती अध्यक्षांनी व समिती सदस्यांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक त्रिपाठी यांच्याकडे अनेकदा मागणी करूनही बैठका घेण्याबाबत चालढकल करण्यात आली होती, असे सदस्यांचे म्हणणे होते. त्यामुळे कोणताही विषय थेट मुख्य बैठकीत येत असल्याने मुख्य बैठक दीर्घकाळ चालत असल्याचे दिसून येत होते.
मात्र, दुसऱ्या वषीर्ही विविध समिती बैठका होत नसल्याचे दिसून येत असून समित्या नावापुरत्या उरल्या आहेत का अशी शंका उपस्थित होत आहे. (वार्ताहर)
आश्वासनपूर्ती : काही प्रमाणात प्रयत्न सुरू
४निवडणुकीपूर्वी जाहीरनामा प्रसिद्ध करताना जनेतला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या बाबतीत सदस्यांची काही प्रमाणात पावले पडू लागली आहेत. मात्र देहूरोड रेडझोनचा मुख्य प्रश्न प्रलंबित आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना राबविण्याबाबत यश आलेले नाही. त्याबाबत पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. पण, जनतेच्या अवलोकनासाठी सर्व सदस्यांनी दोन वर्षाच्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर सादर करायला हवा.