Sharad Pawar: एकाचवेळी 'ईडी'च्या इतक्या कारवाया याआधी कधी पाहिल्या होत्या का? शरद पवारांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 12:54 PM2021-09-07T12:54:37+5:302021-09-07T12:55:27+5:30
Sharad Pawar: 'ईडी'कडून नाहक त्रास देण्याचं काम सध्या राज्यात सुरू आहे. याआधी ईडीच्या कारवाया तुम्ही कधी पाहिल्या होत्या का?
Sharad Pawar: 'ईडी'कडून नाहक त्रास देण्याचं काम सध्या राज्यात सुरू आहे. याआधी ईडीच्या कारवाया तुम्ही कधी पाहिल्या होत्या का? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ईडीकडून सुरू असलेल्या कारवाया केंद्र सरकार पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप पवारांनी यावेळी केला आहे. ते पुण्यात एका नागरी सहकारी बँकेच्या कार्यक्रमात बोलत होते.
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या संस्थांवर ईडीकडून धाड टाकण्यात आल्याच्या मुद्द्यावर बोलत असताना शरद पवार यांनी भावना गवळी यांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचं म्हटलं. ईडी आणि सीबीआय सारख्या संस्थांचा वापर करुन केंद्र सरकार संपूर्ण देशभर व राज्यात अनावश्यक त्रास देण्याचं काम करत आहे, असं शरद पवार म्हणाले. ईडीच्या कारवाया म्हणजे राज्य सरकारच्या अधिकारांवर गदा आणण्याचं काम असल्याचंही ते म्हणाले.
VIDEO: एकाचवेळी 'ईडी'च्या इतक्या कारवाया याआधी कधी पाहिल्या होत्या का? शरद पवारांचा हल्लाबोल pic.twitter.com/jkT0FBhrQX
— Lokmat (@MiLOKMAT) September 7, 2021
नागरी सहकारी बँका बंद करण्याचा रिझर्व्ह बँकेचा इरादा
रिझर्व्ह बँकेचं नागरी सहकारी बँकांबाबतचं नवं धोरण पाहिलं असता देशातून नागरी सहकारी बँका बंद करण्याचा रिझर्व्ह बँकेचा इरादा दिसतोय, असं म्हणत शरद पवार यांनी रिझर्व्ह बँकेच्या नव्या धोरणाला कडाडून विरोध केला आहे. विशिष्ट लोकांच्या हाती सूत्रं देऊन सहकार क्षेत्र संपविण्याचा घाट केंद्राकडून सुरू असल्याचाही घणाघात त्यांनी केला आहे.
भागवतांच्या विधानाचा एका वाक्यात समाचार
हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते. त्यामुळे प्रत्येक भारतीय आम्ही हिंदूच मानतो, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार यांनी भागवतांच्या दाव्यावर एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. "भागवतांच्या विधानानं माझ्या ज्ञानात भर पडली", असं म्हणत शरद पवार यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
ब्रिटिशांनी भारतात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम केलं. मुस्लिमांची माथी भडवकवून वेगळ्या राष्ट्रासाठी प्रोत्साहन देण्याचं काम ब्रिटिशांनी केलं. पण हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते. त्यामुळे देशातील प्रत्येक भारतीय आम्ही हिंदूच मानतो, असं विधान मोहन भागवत यांनी केलं होतं. ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.