Talathi Bharti: तलाठी भरतीचा अर्ज भरलाय का? आज अखेरची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 02:03 PM2023-07-25T14:03:42+5:302023-07-25T14:05:29+5:30
मुदतवाढीनंतर सोमवारपर्यंत १२ लाख ५२ हजार अर्ज आले होते...
पुणे : राज्य सरकारकडून चार हजार ६४४ तलाठी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होती. १७ जुलै अर्ज करण्याचा शेवटची तारीख होती. मात्र, भरती प्रक्रियेला मिळणार प्रतिसाद आणि काही ठिकाणी आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे १८ जुलैपर्यंत मुदत वाढवण्यात आली. या दिवशीदेखील उमेदवारांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला तसेच अर्ज करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात आली. अखेर मंगळवार (दि. २५) जुलैपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढीनंतर सोमवारपर्यंत १२ लाख ५२ हजार अर्ज आले होते.
जमाबंदीचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे राज्यातील काही भागात इंटरनेट सेवा प्रभावित झाली. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना यामुळे अर्ज करता आले नाही. अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे उमेदवारांना अर्ज करता आले नाहीत. या स्वरूपात शासन स्तरावर निवेदने प्राप्त झाली होती. त्यामुळे या सगळ्याचा विचार करून उमेदवारांना अर्ज करण्यास २५ जुलैपर्यंत अर्ज करण्यास तसेच फी भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली.
दोन शिफ्टमध्ये होईल परीक्षा
साधारणपणे साडेबारा लाख अर्ज आले आहेत. त्यामुळे साधारणपणे अर्जांची छाननी झाल्यानंतर परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येईल. साधारण दोन ते तीन शिफ्टमध्ये परीक्षेचे नियोजन करण्यात येईल. साधारणपण एका शिफ्टमध्ये ३० हजार विद्यार्थी असतील तर तीन शिफ्टमध्ये मिळून ९० हजार विद्यार्थी असतील. तीन शिफ्टमध्ये परीक्षा घेतली तर सकाळी आठ ते रात्री आठ असे नियोजन करावे लागेल. तीन शिफ्टमधील परीक्षा महिला उमेदवारांसाठी सोयीची राहणार नाही. त्यामुळे दोन शिफ्टमध्येच परीक्षा होण्याची शक्यता आहे. ६० हजार विद्यार्थी एका दिवसात परीक्षा देऊ शकतील. या अंदाजाने सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा होण्यास वीस दिवसांचा कालावधी लागू शकतो.
परीक्षा घेण्याची जबाबदारी कंत्राट दिलेल्या कंपनीला देण्यात आलेली आहे. तिला प्रशासनातर्फे आम्ही सर्व ते सहकार्य करणार आहोत. परीक्षा किती शिफ्टमध्ये घ्यायची, याचा निर्णय त्यांचा असणार आहे. परीक्षेसाठी पोलिस बंदोबस्त तसेच केंद्राचा अधिकारी प्रशासनाकडून देण्यात येईल.
- आनंद रायते, अतिरिक्त आयुक्त, जमाबंदी