स्मार्ट सिटीचं ''स्मार्ट'' फेस्टिवल तुम्ही पाहिलंत का ?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 06:23 PM2019-02-19T18:23:20+5:302019-02-19T18:26:21+5:30
पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असल्याने पुण्याला सांस्कृतिकदृष्ट्या स्मार्ट करण्यात येत आहे.
पुणे : स्मार्ट सिटीकडून पुण्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पुण्याला सर्वांगानी स्मार्ट कसं करता येईल याकडे लक्ष देण्यात येत आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असल्याने पुण्याला सांस्कृतिकदृष्ट्या स्मार्ट करण्यात येत आहे. सध्या स्मार्ट सिटीकडून पुणे स्मार्ट आर्ट वीक साजरा करण्यात येत असून याअंतर्गत शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबराेबरच आर्ट फेस्टिवल भरविण्यात आले आहे. सध्या तुम्ही जर जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता पाहिलात तर तुम्हाला पाश्चिमात्य देशात आल्यासारखे वाटेल. या दाेन्ही रस्त्यांवर आकर्षक अशी इंन्स्टाॅलेशन्स बसविण्यात आली असून ती सध्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
पुणे स्मार्ट आर्ट वीकचं हे पहिलंच वर्ष आहे. पुण्याला स्मार्ट करत असताना विविध प्रकल्प राबविण्याबराेबरच पुणेकरांची सांस्कृतिक गरज लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सध्या जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन रस्त्यावर अनेक इंन्स्टाॅलेशन्स उभारण्यात आले आहेत. पुण्यातील विविध आर्ट महाविद्यालयांच्या माध्यामातून हे इंन्स्टाॅलेशन्स तयार करण्यात आले आहेत. त्याचबराेबर नागरिकांना आकर्षित करतील असे कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आले आहेत. अगदी जंगली महाराज रस्त्यावर राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकारांच्या काॅन्सर्ट हाेत असल्याने सध्या पुण्याला एक वेगळेच रुप मिळत आहे. बालगंधर्व, पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक केंद्र, पाेलीस परेड ग्राऊंड या ठिकाणी सुद्धा कार्यक्रमांची मेजवानी पुणेकरांना मिळत आहे. 24 फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या फेस्टिवल मध्ये पंडित निलाद्री कुमार यांचा कार्यक्रम आणि तरुणाईला भुरळ घालणाऱ्या भाडिपाचा स्टॅण्डअप काॅमेडीचा कार्यक्रम पुणेकरांसाठी आकर्षण असणार आहे.