#MiPunekar : आहाहा... पुण्यातले 'हे' सात पदार्थ म्हणजे खवय्यांसाठी स्वर्गसुखच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 04:50 PM2018-03-13T16:50:01+5:302018-03-13T20:00:33+5:30
पुण्याचा गणेशोत्सव,पुण्यातील पर्यटनस्थळे, पुण्यातील सांस्कृतिक चळवळ जशी प्रसिद्ध आहे तशीच पुण्याची खाद्य संस्कृतीही तितकीच प्रसिद्ध आहे. त्यामुळे तुम्ही पुण्यात राहून हे पदार्थ ट्राय केले नसतील तर तुम्ही पुण्याच्या अस्सल चवीला मुकला आहात.
पुणे : पुण्यातील पुणेरी पाट्या जश्या जगप्रसिद्ध आहेत. तशीच पुण्यातील खाद्यसंस्कृतीही जगात नावाजली जाते. पुणेकर चाणाक्ष असल्याने त्यांच्या आवडीचे पदार्थही त्याच पद्दतीचे असतात. तेव्हा तुम्ही पुण्यात आहात आणि खालील पदार्थ तुम्ही ट्राय केले नसतील, तर आजच या पदार्थांचा आस्वाद घ्या.
गार्डन वडापाव
नळस्टॉप आणि कॅम्प भागात हा वडापाव मिळतो. येथील वड्याची साईज मोठी असते. तसेच पावामध्ये हिरवी चटणी व सोबत चिरलेला कांदा याची खासियत अाहे. पुणेकरांमध्ये हा वडापाव खूप फेमस असून याचा आस्वाद घेण्यासाठी पुणेकर रोज संध्याकाळी गर्दी करतात.
संतोष बेकरीचे पॅटीस
रविवारी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाष्ट्याला संतोषचे पॅटीस खवय्ये पुणेकर खात नाहीत असं क्वचितच होत असेल. आपटे रस्त्यावरील या बेकरीमध्ये खमंग गरमागरम पॅटीस मिळतात. त्याचबरोबर या ठिकाणची वाटी केकही उत्तम असते.
अनारसे सामोसा
तुम्ही जर सदाशिव पेठेत आहात आणि तुम्हाला सामोसा खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही अनारसे सामोसा नक्कीच ट्राय करायला हवा. या सामोस्यासोबत मिळणाऱ्या चटणीला नागरिकांकडून विशेष पसंती असते. जिवाला खा! असे येथील ब्रिदवाक्य आहे.
गुडलकचा बनमस्का
सकाळचा नाष्टा करायचाय आणि काही तेलकट खायचं नसेल तर मग गुडलकचा बनमस्का खायालाच हवा. डेक्कन येथील गुडलकच्या बनमस्क्याला पर्याय नाही. गरमागरम चहा आणि लोण्याइतक्याच मऊ असलेला बनमस्का पुणेकरांचा दिनक्रमच आहे. विकेंडला येथील बनमस्का खाण्यासाठी लोकांच्या रांगा लागतात.
दुर्गाची कोल्डकॉफी
दुर्गाची कोल्डकॉफी म्हणजे सुख:, अशी भावना पुण्यातील तरुणाईत पाहायला मिळते. कोथरुड येथील या कॅफेमध्ये कोल्डकॉफी पिण्यासाठी दिवसभर गर्दी पाहायला मिळते. येथे मिळणाऱ्या थिक कॉफीमुळे ही कॉफी तरुणांची आवडती आहे.
सुजाता मस्तानी
इतिहासात मस्तानी नावाला जितकं वलय आहे तितकंच वलय खाद्य संस्कृतीतल्या मस्तानीला आहे. घट्ट आणि गोड दूध त्यात आईस्क्रीम आणि त्यावर काजू, बेदाणे आणि बदामाचे तुकडे असलेली पुण्यातील ही मस्तानी मनतृप्त करते. उन्हाळ्यात थंडगार मस्तानी स्वर्गसुखाचा आनंद देते यात शंका नाही.
वाडेश्वरचे आप्पे
पुण्यात तुम्हाला साऊथ इंडियन खायचयं, तर मग वाडेश्वरला भेट द्यायलायच हवी. येथील आप्पे तुम्हाला वेगळाच आनंद देऊन जातात. या आप्प्यांसोबत मिळणारी खाेबऱ्याची चटणीही उत्तम लागते. या आप्पायांच्या जोडीला कॉफी असेल तर उत्तमच. या आप्प्यांची चव खूप काळ जीभेवर रेंगाळत राहते.