हवेली बाजार समिती निवडणूक : ग्रामपंचायत मतदार संघात दोन्ही पॅनलला प्रत्येकी दोन जागा
By अजित घस्ते | Published: April 29, 2023 01:58 PM2023-04-29T13:58:02+5:302023-04-29T13:59:49+5:30
पॅनेलमध्ये अण्णासाहेब शेतकरी विकास आघाडीत भाजपा उमेदवार निवडून आला आहे...
पुणे : हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत मतदार संघात चार जागेसाठी ११ उमेदवार रिंगणात होते. एकूण ७१३ मतदान होते यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे २ आणि अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे सर्वपक्षीय पॅनलचे २ उमेदवार विजयी झाले आहेत. अत्यंत चुरशीने मतदान झाल्यामुळे समसमान जागांवर विजय मिळाल्याचे स्पष्ट झाले असले तरी यामध्ये पहिल्यांदाच भाजपने बाजार समितीच्या सहकार क्षेत्रात शिरकाव केला आहे. अण्णासाहेब शेतकरी विकास आघाडीत भाजपा उमेदवार निवडून आला आहे. यामध्ये चौधरी सुदर्शन विजय झाले आहेत.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातील दोन्ही निकाल जाहीर झाले असून विजयी उमेदवारांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रामकृष्ण सातव (वाघोली) हे सर्वाधिक ४०५ मते घेऊन विजयी झाले आहेत. तर, अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे सुदर्शन चौधरी (सोरतापवाडी) २५६ मते घेवून विजयी झाले आहेत.
ग्रामपंचायत मतदार संघात अनुसूचित जाती जमाती मतदार संघातील एका जागेसाठी ३ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे नानासाहेब आबनावे (चंदन नगर खराडी) हे ३०७ मतांनी विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघात शेतकरी विकास आघाडीचे रवींद्र कंद (लोणीकंद) ३७५ मते घेवून विजयी झाले आहेत.
विजय उमेदवार:
सर्वसाधारण गट: 2 जागा:
विजय उमेदवार : मतदान संख्या
१) सातव रामकृष्ण : ४०५
२) चौधरी सुदर्शन : २५६
३)अनुसूचित जाती जमती : १ जागा: आबनावे नानासाहेब: ३०७
४) आर्थिक दुर्लक्ष घटक : १ जागा : कंद रवींद्र: ३७५