Pune: दाखल्यांसाठी पुन्हा ससेहोलपट, सर्व्हर बंद पडल्याने अर्जच करता येईनात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 06:35 PM2023-06-30T18:35:01+5:302023-06-30T18:35:40+5:30
सुमारे १५ ते १६ हजार अर्ज प्रलंबित...
पुणे : गेल्या आठवड्यात फिफो प्रणालीमुळे दाखले मिळण्यात अडचणी येत होत्या. आता महाआयटीचे सर्व्हर बंद असल्याने अद्यापही ही समस्या सुरूच आहे. त्यामुळे दाखल्यांसाठी विद्यार्थी व पालकांची ससेहोलपट सुरूच आहे. सर्व्हर बंद पडल्याने दाखल्यांसाठी अर्ज करता येत नसल्याने सरकारी परीक्षांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे मिळत नाहीत. सध्या हवेली व पिंपरी तहसील कार्यालयातील सुमारे १५ ते १६ हजार अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे अनेकांच्या करिअरचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हवेली व पिंपरी तहसील कार्यालयात फिफो प्रणालीत प्रथम येणाऱ्यास पहिले प्राधान्य यानुसार अर्ज निकाली काढले जात होते. मात्र, यामुळे दाखले प्रलंबित राहण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले होते. शाळा महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी दाखले मिळत नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकही हतबल झाले होते. ही समस्या राज्यातील तीन तालुक्यांत होती. त्यामुळे ही प्रणाली बंद करून पूर्वीच्याच पद्धतीने दाखले देण्यात यावे यासाठी ‘लोकमत’ने पाठपुरावा केला होता. त्यानुसार ही प्रणाली आता बंद करण्यात आली असून पूर्वीच्या पद्धतीने अर्थात तातडीच्या अर्जांवर तहसील कार्यालयात कार्यवाही करण्यात येत आहे.
मात्र, त्यानंतर आता ज्या संकेतस्थळावरून अर्ज दाखल केले जातात, त्या संकेतस्थळाचे सर्व्हर बंद असल्याने दाखल्यांसाठी अर्ज करता येत नसल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्यापासून ही समस्या उद्भवली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालक वैतागले आहेत. गेल्या आठवड्यात हे संकेतस्थळ सायंकाळनंतर काही काळ सुरू असायचे. त्यामुळे काही प्रमाणात अर्ज दाखल करता येत होते. मात्र, आता सर्व्हर पूर्णपणे बंद पडले आहे. त्यामुळे महा-ई-सेवा केंद्रामध्ये अर्जदारांची गर्दी वाढली आहे.
याबाबत हडपसर येथील महा-ई-सेवा केंद्राचे चालक अमोल वावरे म्हणाले, ‘गेल्या आठवड्यापासून साइट बंद आहे. तीन- चार दिवसांपूर्वी अर्ज दाखल करताना कागदपत्रे अपलोड होत होती. मात्र, अर्जांची फी भरताना सर्व्हर बंद पडून एरर येत असल्याने अर्ज दाखल होत नव्हता. गेल्या तीन दिवसांपासून तर केवल लॉगिन केल्यानंतरच एररचा मेसेज येत आहे. त्यामुळे अर्जच दाखल करता येत नाही.
दुसऱ्या एका केंद्रचालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, ‘गेल्या तीन दिवसांपासून मेन्टेनन्सच्या कारणास्तव रात्री ९ ते सकाळी ९ पर्यंत संकेतस्थळ बंद ठेवण्यात आले होते. शुकव्रारी संकेतस्थळ सुरू होईल असे सांगण्यात आले होते. मात्र, सायंकाळपर्यंत ते सुरू झाले नाही. याबाबत महाआयटीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला मात्र, काम सुरू आहे असे सांगण्यात आले. फिफो प्रणाली बंद झाल्यानंतर नेहमीच्या पद्धतीतून केवळ तातडीच्या व शैक्षणिक कारणांसाठीचे ३ ते ४ हजार दाखले वितरित करण्यात आले असल्याचे संबंधित केंद्रचालकाने सांगितले.
सर्व्हर डाऊन असल्याने अर्ज करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याबाबत महाआयटीकडे पाठपुरावा सुरू आहे. येत्या एक-दोन दिवसांत ही समस्या सुटेल.
- किरण सुरवसे, तहसीलदार, हवेली.