मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, गाड्यांच्या सीटही फाडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 01:06 AM2018-10-02T01:06:27+5:302018-10-02T01:06:54+5:30
आबालवृद्धांना धोका : बंदोबस्त करण्याची होतेय मागणी
महाळुंगे : महाळुंगे परिसरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. परिसरातील नागरिकांना अनेक वेळा कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना ताज्या असताना मोकाट कुत्र्यांनी आता मोटारसायकल लक्ष्य केले आहे. रात्रीच्या वेळी गावातील अनेक मोटारसायकलच्या बैठकीचा चावा घेतला आहे. त्यामुळे आता रात्रीच्या वेळी मोटारसायकल ठेवायच्या कुठे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
येथे काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा सर्व नागरिकांना खूप त्रास होत आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, मोटरसायकल यांच्यावर अचानक मोकाट कुत्री हल्ला करतात. त्यामुळे अनेक जण जखमीसुद्धा झाले आहेत. याची प्रशासनाने दखल घ्यावी. कुत्र्यांचा मोठा सुळसुळाट झाला असून, मोठ्या संख्येने कळपात फिरणाऱ्या या कुत्र्यांमुळे नागरिक व लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. २५ ते ३०च्या संख्येत मोठ्या कळपस्वरूपात ही कुत्री एखादे जनावर किंवा रस्त्याने जाणाºया नागरिकांच्या गाड्यांच्या मागे लागतात. विशेषत: मुली व स्त्रियांना याचा मोठा त्रास होत आहे.
महाळुंगे औद्योगिक वसाहतीत भटक्या मोकाट फिरणाºया कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे परिसरात राहणाºया नागरिक, आबालवृद्ध, शालेय विद्यार्थी तसेच लहान मुलांना कधीही कुत्री चावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
गाड्यांच्या सीट फाडल्या
महाळुंगे परिसरातील खराबवाडी, खालुंब्रे, वाघजाईनगर, आंबेठाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्री फिरत असतात. अनेक वेळा वाहन चालवणाºया नागरिकांच्या मागे कुत्री धावतात, लहान मुले, महिलांमध्येही भीती पसरली आहे. अनेक नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे.अनेक गाड्यांच्या बेठकीच्या जागाही कुत्र्यांनी फाडून नुकसान केले आहे. तरी त्यांचा लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.