बिबट्यापाठोपाठ तरसाचा धुमाकूळ
By admin | Published: January 31, 2015 10:47 PM2015-01-31T22:47:45+5:302015-01-31T22:47:45+5:30
बिबट्याचा वावर असल्याबरोबरच काल रात्री तरसाने रामलिंग रोडवरील शिक्षक वसाहत परिसरात धुमाकूळ घातला
शिरूर : बिबट्याचा वावर असल्याबरोबरच काल रात्री तरसाने रामलिंग रोडवरील शिक्षक वसाहत परिसरात धुमाकूळ घातला. दरम्यान, कुंभारआळी परिसरातील नागरिकांनी पिंजऱ्याच्या मागणीचे निवेदन वन विभागाला दिले आहे.
दोन दिवसांपूर्वी कुंभारआळीतील नागरिकांनी बिबट्याला पाहिले होते. वनाधिकारी डी. वाय. भुर्के यांनी ठशांची तपासणी केली असता बिबट्याच्याच पायाचे ठसे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. दुसऱ्या दिवशीही वीटभट्टीवर विटांवर असेच ठसे आढळून आले होते. कुंभारआळीसह नदीकिनारील इतर भागातील नागरिक यामुळे अद्यापही भीतीच्या सावटाखाली आहेत. बिबट्याचा उपद्रव अचानक जाणवेल, याची शक्यता असल्याने तो पकडला जावा, अशीच नागरिकांची अपेक्षा आहे. गेले तीन दिवस संपूर्ण शहरात बिबट्याचीच चर्चा आहे. आज सकाळी रामलिंग रोडवर शिक्षक वसाहतीजवळ एका वीटभट्टीजवळ बिबट्याने विटेसाठी लागणारी माती अस्ताव्यस्त केली, अशी बातमी शहरात पसरली. वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तेथे पाहणी केली. मात्र, ते ठसे तरसाचे असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले. तरस असला, तरीही रामलिंग रोड परिसरातील नागरिक बिबट्याच त्या भागात आला समजून भयभीत झाले आहेत.
४कुंभारआळी भागातील
नागरिकांनी पिंजरा लावण्यासाठी लेखी निवेदन वन विभागाकडे दिले. आणखी एका संघटनेनेही अशा स्वरूपाची लेखी मागणी केली. यानुसार उद्या दुपारपर्यंत संबंधित भागात पिंजरा लावला जाईल, असे वनरक्षकाने सांगितले.