गुटख्यामध्ये घातक रसायने, कारवाईची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 11:51 PM2019-01-08T23:51:27+5:302019-01-08T23:51:54+5:30

अन्न व औषध प्रशासनाचा अहवाल : नोव्हेंबरमध्ये पोलिसांनी टाकला होता छापा

Hazardous chemicals in gutka, recommendation of action | गुटख्यामध्ये घातक रसायने, कारवाईची शिफारस

गुटख्यामध्ये घातक रसायने, कारवाईची शिफारस

Next

लोणी काळभोर : येथील पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोन महिन्यांपूर्वी पकडलेल्या गुटख्या संदर्भातील अन्न व औषध प्रशासनाचा अहवाल पोलिसांना मिळाला असून सदर गुटख्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटसह कर्करोग होऊ शकतील, अशी घातक रसायने असून संबंधितावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर २०१८ रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाने २९ लाख ६६ हजार रुपये किमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गोवा कंपनीचा गुटखा जप्त केला होता. याप्रकरणी गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला १२ लाख रुपये किमतीचा टेम्पो ताब्यात घेतला होता व त्यावरील परप्रांतीय चालकास अटक करण्यात आली होती. ही कारवाई कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाका येथे ६ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी साडेआठला करण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक महेश ढवाण, हवालदार समीर चमनशेख, सचिन मोरे, परशराम सांगळे, सागर कडू या पोलीस पथकाने केली होती. या वेळी शेंदरी रंगाच्या आयशर टेम्पो (टीएस १२, यूए ५५७२) ची तपासणी केली. त्याच्या मागील बाजूस २९ लाख ६६ हजार रुपये किमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गोवा कंपनीचा गुटखा मिळून आला. टेम्पोचालक शमीम अब्दुल वाहीद अहमद (वय ३२, रा. कोकटपल्ली हबीबनगर, हैदराबाद) यास सदर टेम्पो व मालासह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याकरीता अन्न व औषध प्रशासन पुणे यांचेकडे सुपूर्त करण्यात आला असून एकूण कारवाईमध्ये २९ लाख ६६ हजार रुपये किमतीचा गुटखा व १२ लाख किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण ४१ लाख ६६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता.

अन्न व औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी गणपत पांडुरंग कोकणे (वय ५१, रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) यांनी या गुटख्याची तपासणी करून पोलिसांना अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार सदरचा माल हा गुटखा असून त्यात कॅल्शियम कार्बोनेटसारखे बंदी घातलेले घटक आहेत. संबंधितांनी अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ व २०११ चे उल्लंघन केले आहे. या गुटख्यामुळे कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे संबंधितांवर योग्य ती कडक कारवाई करावी, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.

Web Title: Hazardous chemicals in gutka, recommendation of action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे