’हजरात हजरात हजरात’......! मनोज बाजपेयींच्या सादरीकरणाला शिट्ट्या अन् टाळ्यांची दाद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 08:54 PM2023-03-22T20:54:51+5:302023-03-22T21:20:59+5:30
विद्यार्थ्यांनो आज तुम्हाला हवं ते मिळतंय आणि जे तुम्हाला मांडायचं ते मांडू शकता
पुणे : आमची काम करण्याची पद्धत वेगळी असते. डायलॉग आम्ही विशेष कधी बोलत नाही. पात्र जसे असेल तसेच ते आम्ही निभवण्याचा प्रयत्न करतो असे सांगत प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी यांनी ‘हजरात हजरात हजरात... हे तीन शब्द उच्चारताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. 'गँग्स ऑफ वसेपूर' चित्रपटातील हा डायलॉग खास त्याच बिहारी स्टाईलमध्ये सादर करीत त्यांनी सर्वांचीच मने जिंकली! विद्यार्थ्यांनी शिट्ट़्यांच्या निनादात एका प्रतिभावंत अभिनेत्याला उत्स्फूर्त दाद दिली.
निमित्त होते, सामाजिक आर्थिक विकास संस्था, स्वप्नभूमी निर्मित आणि एचसीएल फौंडेशनच्या सहकार्याने आयोजित ’फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे. ‘स्वाभिमान, सत्या, गँग्स ऑफ वसेपूर, फँमिली मँन, गुलमोहर सारख्या विविध मालिका, चित्रपट आणि वेबसिरीजद्वारे अभिनयाची ताकद दाखवून देणा-या मनोज बाजपेयी यांच्या उपस्थितीने विद्यार्थ्यांची सायंकाळ अविस्मरणीय ठरली. बाजपेयी यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या बीएमसीसी कॉलेजला फिरोदिया करंडक देण्यात आला. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाला दुसरा क्रमांकाचे तर आकुर्डीतील डॉ. डी.वाय पाटील महाविद्यालयाला तिस-या क्रमाकांचे पारितोषिक देण्यात आले.
''मी ज्या भागातून आलो ते एक शेतकरी कुटुंब. त्या कुटुंबातील मी एक मुलगा होतो. माझ्यात जिद्द होती. मला माहिती होतं की मला अभिनेता व्हायचं आहे. पण पाटण्याला जायचं तर गावापासून तिथं जायला दोन दिवस लागायचे. मुंबई तर खूपच दूरच होती. वयाच्या 18 वर्षांपर्यंत मला फिरोदिया सारखं व्यासपीठ मिळाल नाही. नाटकाची सुविधा नव्हती. मला जे करायचं नव्हतं ते मी करत होतो. पण आज तुम्हाला हवं ते मिळालं आहे. तुम्हाला जे मांडायचं आहे ती तुम्ही मांडू शकता. त्यामुळे ’मुझे आपसे जलन है’....अशी भावना मनोज बाजपेयी यांनी व्यक्त केली. ‘वो पुराने दिन कहा गये, वो आशिकाना दिन कहा गये...असे म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना जिंकले.
शाळांमध्ये किमान एक कला अनिवार्य करावी
कलाकार कोणत्याही क्षेत्रात गेला तरी त्यांच्यातील वेगळेपण सिसते. केंद्र व राज्य सरकारने शाळांमध्ये किमान एक कला अनिवार्य केली पाहिजे. जेणेकरुन शाळांमध्ये कलांना पूरक वातावरण निर्माण होईल- अभिनेते मनोज बाजपेयी