नव्या चित्रपटाची एचडी प्रिंट २० रुपयांत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2016 04:00 AM2016-02-25T04:00:06+5:302016-02-25T04:00:06+5:30

नवीन चित्रपटाची तीन दिवसांत बेकायदा विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या चित्रपटांची हाय डेफिनेशन (एचडी) प्रिंट २० रुपयांत विकली जात आहे. टपरीधारक, हातगाडीवाले

HD print of new movie 20 rupees! | नव्या चित्रपटाची एचडी प्रिंट २० रुपयांत!

नव्या चित्रपटाची एचडी प्रिंट २० रुपयांत!

googlenewsNext

पिंपरी : नवीन चित्रपटाची तीन दिवसांत बेकायदा विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या चित्रपटांची हाय डेफिनेशन (एचडी) प्रिंट २० रुपयांत विकली जात आहे. टपरीधारक, हातगाडीवाले रस्त्यांवर खुलेआम पायरेटेड सीडी विकतात. मात्र आता, मोबाइल दुकानदार, सायबर कॅफे चालविणारे नवीन चित्रपट डाऊनलोड करून त्याची बेकायदा विक्री करीत आहेत. या माध्यमातून पैसे कमवायचा नवा फंडा त्यांनी अमलात आणला आहे. याबाबत लोकमत टीमने आकुर्डी भागात पाहणी केली. एका मोबाइल शॉपीमध्ये चित्रपट हस्तांतरित करताना आढळले.
ठिकाण : आकुर्डी वेळ : स. ११.३०
काउंटरवर असणाऱ्या व्यक्तीला नवीन चित्रपट आहे का, अशी विचारणा केली. त्याने बाजूच्या काउंटरवर जायला सांगितले. तेथे एक मुलगा लॅपटॉप व संगणकावर काही तरी काम करीत होता. तो म्हणाला, ‘‘बोला काय पाहिजे?’’ ‘‘नवीन कोणता चित्रपट आहे का?’’
तो म्हणाला, ‘‘कोणता हवा आहे?’’ मी म्हटले, ‘‘नवीन कोणताही चालेल.’’ तो म्हणाला, ‘‘मराठी, हिंदी, इंग्रजी, भोजपुरी, गुजराती, साऊथ इंडियन; कोणत्या भाषेतील हवा आहे?’’ ‘‘हिंदीतील नवीन चित्रपट पाहिजे.’’ त्याने काउंटरवर ठेवलेल्या याद्या दाखविल्या. त्या पाहून हैराण झालो. सर्व भाषांतील चित्रपटांच्या त्याने याद्याच करून ठेवल्या होत्या. आपण फक्त नाव सांगायचे; पाच मिनिटांत लगेच चित्रपट मोबाइल किंवा मेमरी कार्डमध्ये डाऊनलोड करून दिला जात होता.
शुक्रवारी आलेल्या नवीन हिंदी चित्रपटाची मागणी केली. त्याने सांगितले, ‘‘साहेब, कमीत कमी तीन-चार दिवस लागतात नवीन चित्रपट यायला.’’ मी बोललो, ‘‘अहो, आज मंगळवार आहे. चार दिवस झाले की.’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘ठीक आहे. मी आज डाऊनलोड करून ठेवतो. तुम्ही आज संध्याकाळी किंवा उद्या या.’’
मग मागील आठवड्यात रिलीज झालेल्या चित्रपटाची मागणी केली. आणि त्याने मोबाइल संगणकाला जोडला आणि पाच मिनिटांत मोबाइलमध्ये चित्रपट कॉपी झाला. त्याने यासाठी २० रुपयांची मागणी केली. मी त्याला काही कमी नाही होणार का, असे विचारले. तो बोलला, ‘‘नाही. एका चित्रपटाला काही कमी नाही. तीन चित्रपट एकदम घेतले, तर ५० रुपयांना भेटतील.’’ (प्रतिनिधी)

सोशल मीडिया व इंटरनेटमुळे अनेक सुविधांचा लाभ घेणे सहज सोपे झाले आहे. मोबाइलवर विविध अ‍ॅपद्वारे अनेक गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत. या सुविधांमुळे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर लगेचच कोणाच्या ना कोणाच्या मोबाइलवर आपल्याला पाहायला मिळतो. शहरातील सिनेमागृहांचे रूपांतर मल्टिप्लेक्समध्ये झाले आहे.
चित्रपट पाहण्यासाठी शेकडो रुपये खर्च करण्यापेक्षा शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी मोबाइलवरच चित्रपट पाहतात. अगदी सिनेमागृहात पाहतोय त्याच दर्जाची प्रिंट पाहायला मिळत आहे.
कमी खर्चात एचडी प्रिंट असलेला नवीन चित्रपट पाहायला मिळतो. याशिवाय हाच चित्रपट एकमेकांना पाठविला जातो.

Web Title: HD print of new movie 20 rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.