‘त्याला’ जेवणही महाग अन् झोपायला होता बाकडा; देशभर गाजणाऱ्या संतोष जाधवची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 02:18 PM2022-06-19T14:18:41+5:302022-06-19T14:19:10+5:30
संतोष जाधवला अटक केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याचे खडतर जीवन समोर आले
पुणे: प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात शॉर्प शूटर म्हणून संशयित असलेल्या संतोष जाधवचे नाव घेतल्याने देशभरात त्याच्या नावाची चर्चा झाली. चार राज्यांतील पोलीस त्याच्या मागावर होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला गुजरातमधून मांडवी तालुक्यातील नागोर गावातून गेल्या आठवड्यात पकडले. त्याच्याकडे पंजाब, हरयाणा, मुंबई पोलीस चौकशी करीत आहेत. आज देशभरात त्याचे नाव झाले असले. असंख्य तरुण तरुणींना त्याचे आकर्षण वाटत आहे. असे असले तरी पोलिसांपासून लपताना तो अन्नालाही महाग झाला होता. दुसऱ्याच्या मेहरबानीवर त्याला जगावे लागत होते. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याचे खडतर जीवन समोर आले.
गँगस्टर म्हटले तर हातात सोन्याचे कडे, गळ्यात जाडजूड सोन्याच्या साखळ्या, ऑर्डर झेलायला अनेक तरुण पोरं, कोणाला फोन केला तर ताबडतोब हवे ते समोर येणार असे अनेकांच्या डोळ्यासमोर चित्र असते. प्रत्यक्षात मात्र त्याच्या विपरीत परिस्थितीला अशा गँगस्टरांना सामोरे जावे लागत असते. पोलिसांपासून वाचण्यासाठी संतोष जाधवला जी धडपड करावी लागली, त्यातून अशा गॅगस्टरची काय गत होते, हे समोर आले.
ओंकार बाणखेले याचा खून केल्यानंतर संतोष जाधव हा फरार झाला. तो बिष्णोई टोळीत सामील झाला. पण, त्याला काही सुखासीन जीवन मिळाले नाही. बिष्णोई टोळीच्या सांगण्यावरून त्याने काही ठिकाणी दरोडे, जबरी चोऱ्या केल्या. तरीही त्याला दुसऱ्यांच्या मेहरबानीवर जगावे लागत होते.
ग्रामीण पोलिसांच्या पथकाने त्याला पकडले, तेव्हा तो एका अतिसामान्य हॉटेलमध्ये राहात होता. त्याच्या टोळीतील एकाने सांगितल्यामुळे त्याला सकाळी एका व रात्री दुसऱ्या हॉटेलमध्ये जेवण दिले जात होते. ती हॉटेलही अशीच सामान्य दर्जाची होती. मध्य तरी तो हॉटेलमध्ये पडेल ते काम करून तेथेच हॉटेल बॉयप्रमाणे झोपत असे. त्याला कोणीतरी मोबाइल रिचार्ज करून देत असे.
बिष्णोई टोळी अनेक दावे करून आपल्या टोळीकडे तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असली तरी काम झाले की ते त्यांना कसे फेकून देतात, हे संतोष जाधवची कहाणी ऐकल्यावर लक्षात येईल.
संतोष जाधव टोळीकडून १३ पिस्तुले हस्तगत
जुन्नर तालुक्यातील व्यावसायिकाला खंडणी मागत ठार मागण्याची धमकी देणाऱ्या संताेष जाधव याच्या टोळीतील ७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून १३ पिस्तुले, मोबाईल जप्त केले आहेत. अधिक माहितीनुसार, जुन्नरच्या एका व्यावसायिकाला संतोष जाधव याने व्हाॅट्सॲप कॉल करुन ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. सदर रक्कम दिली नाही, तर गोळ्या घालून मारुन टाकू , अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. संतोष जाधव याला अटक केल्यानंतर या प्रकाराची माहिती संबंधित व्यावसायिकाने दिली. त्यानंतर नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संतोष जाधव याने ५ ते ६ महिन्यांपूर्वी संबंधित व्यावसायिकाला व्हॉटसअॅप कॉल करुन ५० हजार रुपयांची खंडणी मागितली होती. तसेच हप्ता दिला नाही तर गोळ्या घालून मारुन टाकण्याची धमकी दिली होती. त्यानंतर २४ मे रोजी संतोष जाधव याने पुन्हा एकदा कॉल करुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र घाबरुन त्यांनी कोठेही वाच्यता केली नव्हती. पोलिसांनी संतोष जाधवला पकडल्यावर त्यांनी ही माहिती सांगितली.
संतोष जाधव याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने जयेश व मनवर यांना मध्यप्रदेशातून गावठी पिस्तुलाचा साठा आणण्यास पाठविले होते. त्यानंतर पोलिसांनी नहार, थोरात व त्यानंतर एका एकाला अटक केली. त्यांच्याकडून ही शस्त्रे हस्तगत केली. नहार, थोरात व अल्पवयीन मुलगा यांना खंडणीची रक्कम आणण्यासाठी पाठविण्याचा कट रचला होता.
पिस्तुले पाठविली जाणार हाेती हरयाणाला
सदर शस्त्रात्रे मुसेवाला हत्याकांडानंतर आणण्यात आली आहेत. मध्य प्रदेशातून ही पिस्तुले आणली असली तरी त्याच्याबरोबर गोळ्या आणल्या नव्हत्या. त्यामुळे या पिस्तुलांचा उपयोग काय, कशासाठी आणली होती, असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा ही पिस्तुले हरयाणाला पाठविली जाणार असल्याचे सांगण्यात आले. या टोळीतील अनेकांवर यापूर्वी वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्यात खंडणीपासून चोरीचे गुन्हे आहेत.
मुसेवाला हत्येच्या वेळी हाेताे गुजरातमध्ये
गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या झाली, त्यावेळी आपण गुजरातमधील मुद्रा पोर्ट गावात हाेताे, असा दावा संतोष जाधव करीत आहे. मात्र, त्याची खातरजमा करण्यात येत आहे, असे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. संतोष जाधव हा सोशल मीडियावरून बिष्णोई गँगशी गेल्या ३ वर्षांपासून संपर्कात आहे. बाणखेले याचा खून केल्यानंतर तो राजस्थान, गुजरात, पंजाब, हरयाणा येथे गेला होता. बिष्णोई टोळीनेच त्याला आश्रय दिला होता. दिल्लीतील तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिष्णोई याच्याकडे पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पथकाने चौकशी केली. त्यात त्याने संतोष जाधवला ओळखत असल्याची व त्याच्याशी संबंध असल्याची कबुली दिली. संतोषवर अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो लॉरेन्सच्या मूळ गावी जाऊन राहिला होता. मात्र, मुसेवाला हत्याकांडाच्या वेळी तो शूटर म्हणून उपस्थित होता का याची पडताळणी पंजाब पोलीस करीत आहेत. आमच्याकडे उपलब्ध असलेली माहिती आम्ही त्यांना दिली आहे. जी एजन्सी तपास करीत आहे, त्यांनी त्याची पुष्टी करून माहिती द्यावी. याबाबत अधिकृत माहिती पंजाब पोलीसच देतील, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.
अशी आहे या टोळीची कार्यपद्धती
- बिष्णोई टोळीतील अनेकजण परदेशात, तर काही तुरुंगात आहेत. त्यांची पाळेमुळे ६ ते ७ राज्यात पसरली आहेत. याच टोळीतील पाच जणांनी आपणच मुसेवाला याची हत्या घडवून आणली आहे, असा दावा केला. सोशल मीडियावरून ते संपर्कात असतात. एकेका गुंडाची सोशल मीडियावर १०-१० अकाऊंट असल्याचे दिसून आले आहे.
- छोट्या-मोठ्या गुन्ह्यांत सापडलेल्या गुन्हेगारांना मदत करण्याचा बहाणा करून ते आराेपीला आश्रय देतात. त्याच्या जोरावर त्यांच्याकडून आणखी गंभीर गुन्हे करवून घेतात. प्रत्यक्षात टोळीच्या या सदस्यांना ते खूप मदत करतात असे नाही. मात्र, मोठमोठे दावे केले की त्यांची भीती पसरवून ते आपली किंमत व खंडणीची रक्कम वाढवून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यातूनच अधिकाधिक गुंडांना आपल्या टोळीत ओढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असेही पाेलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितले.
राज्यातील टोळीची पाळेमुळे खणणार
बिष्णोई टोळी छोट्या-मोठ्या गुन्ह्यात अडकलेल्या तरुणांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करते. पोलीस ज्यांच्या शोधात आहेत, त्यांची माहिती मिळवून त्यांना मदत करण्याचा, पोलिसांपासून वाचविण्यासाठी आश्रय देण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर त्यांना आपल्या टोळीत सामील करून घेऊन त्यांच्याकडून मोठे गुन्हे करवून घेते. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांच्याविषयी सहानुभूती असणारे तरुण आहेत. त्यांची पाळेमुळे खणून काढण्याचा प्रयत्न पोलीस करणार आहेत.