कौतुकास्पद! त्यांनी टाळला लग्नाचा थाट; शाळेच्या बांधकामासाठी दिले पाच लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 01:27 AM2019-02-02T01:27:03+5:302019-02-02T06:54:39+5:30
भास्कर गाडगे यांचा आदर्श उपक्रम; अनाथ आश्रमास एक लाखांचा दिला निधी
निमगाव सावा : एकीकडे राजकारणी नेतेमंडळींनी त्यांच्या मुला-मुलींच्या लग्नात कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्याचे काम ऐन दुष्काळात सुरूच ठेवले असताना दुसरीकडे उद्योगपती भास्करगाडगे यांनी लग्नाचा थाट टाळून गोरगरिबांची मुले ज्या शाळेत शिकतात, अशा पंडित नेहरू विद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे पाच लाख रुपये व सिंधूताई सपकाळ यांच्या अनाथाश्रमास सुमारे एक लाख रुपयांचा धनादेश दिला.
निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष उद्योगपती भास्कर गाडगे यांनी हा आदर्श समाजासमोर मांडला आहे. त्यांचा मुलगा आशुतोष यांचा विवाह नुकताच पार पडला. लग्नातील महत्त्वाचे विधी आणि हौस त्यांनी केलेच, मात्र केवळ थाट दिसावा, म्हणून करण्यात येणारा खर्च टाळून तो पैसा त्यांनी अनाथाश्रम आणि शाळेसाठी दिला आहे.
निमगाव सावा येथील गोरगरिबांची मुले शिक्षण घेत असलेली पंडित नेहरू विद्यालयाच्या वर्गखोल्या मोडकळीस आल्या होत्या. धोकादायक परिस्थितीत या शाळेत सुमारे एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते. ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष या नात्याने व सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून उद्योगपती भास्कर गाडगे यांनी पुढाकार घेऊन सर्वपक्षीय ग्रामस्थ व पालकांच्या आर्थिक सहकार्यातून सुमारे तीन कोटी रुपये खर्चाच्या या शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे.
मुलीच्या लग्नातही अनाथाश्रमाला निधी
भास्कर गाडगे यांनी आपल्या मुलीच्या लग्नातील अनावश्यक खर्च टाळून सिंधूताई सपकाळ यांच्या अनाथाश्रमास सुमारे एक लाख रुपयांचा निधी दिला होता. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून दरवर्षी आपल्या उत्पन्नातील काही वाटा गोरगरीब, अनाथ, गरजू व गरीब मुलांच्या शिक्षणावर खर्च करीत आहेत.