मेहनतीच्या जोरावर 'तो' झाला, लष्करी अधिकारी;हडपसरच्या प्रतिक बंगचे एनडीएतील प्रशिक्षण पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 10:31 AM2024-12-03T10:31:28+5:302024-12-03T10:35:27+5:30
९ वी इयत्तेत असताना प्रतीक याने देशसेवेसाठी भारतीय लष्करात जाण्याचे ठरविले होते. त्या दृष्टीने त्याने प्रवास सुरू केला.
हडपसर : ध्येय जर निश्चित असेल तर माणूस आपली स्वप्ने सहज पूर्ण करू शकतो हे हडपसरमधील प्रतीक बंगने दाखवून दिले. भारतीय लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न त्याने पूर्ण केले आहे. त्याने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएच्या १४७ कोर्समधून प्रतीक याने ३ वर्षांचे खडतर असे प्रशिक्षण पूर्ण करून पदवी संपादन केली. पुण्याच्या प्रतीक अनिलकुमार बंग याने ३ वर्षांपूर्वी ९ वी इयत्तेत असताना देशसेवेसाठी भारतीय लष्करात जाण्याचे ठरविले होते. त्या दृष्टीने त्याने प्रवास सुरू केला.
महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्याने थेट कोल्हापूर गाठले. पेठ वडगाव येथील आर्म फोर्सेस प्रिप्रेटरी इन्स्टिट्यूटमधून त्याने १२ वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सोबतच त्याने एनडीए प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या प्रवेश प्रक्रियेची तयारी सुरू केली. शिक्षकांचे मिळालेले योग्य मार्गदर्शन, कुटुंबीयांचा आधार आणि मेहनतीच्या जोरावर प्रतीक याने अवघड अशी एनडीए प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून एनडीए प्रवेश मिळविला. घरातील कोणतीही लष्करी पार्श्वभूमी नसताना प्रतीकने लष्करी अधिकारी बनण्याचे ठरवले होते. प्रतीकचे वडील हे बांधकाम व्यावसायिक असून आई गृहिणी आहे. एका व्यापारी कुटुंबातील मुलगा देशसेवा करण्यासाठी लष्करात जातोय. प्रतीकने सिद्ध करून दाखविले की ध्येय निश्चित असेल तर यश मिळतेच आणि त्याने एनडीएमधील खडतर असे प्रशिक्षण पूर्ण केले.
गौरवास्पद सेवेत आल्याचा आनंद देशातील प्रत्येक माणूस आपापल्या पद्धतीने देशसेवा करत असतो; पण मला भारतीय लष्कराच्या माध्यमातून देशसेवा करता येणार आहे याचा आनंद आणि अभिमान आहे. एनडीएमध्ये येण्यासाठी देशभरातून लाखो विद्यार्थी प्रयत्न करतात मात्र खूप कमी विद्यार्थ्यांना यश मिळते. त्यासाठी शाळेत असतानाच तुम्हाला तयारी सुरु करावी लागेल. विशेषतः गणित, भौतिकशास्त्र या विषयाचा अभ्यास पक्का करा आणि देशसेवेच्या सर्वात गौरवास्पद सेवेत या. असे प्रतिक याने सांगितले.