सासूच्या पाया पडण्याच्या बहाण्याने खाली वाकला आणि..! पोलीस ठाण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 12:17 PM2023-02-12T12:17:33+5:302023-02-12T12:17:39+5:30
सुदैवाने दक्ष पोलिस उपनिरीक्षकाने जावयाला वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला
पुणे: कौटुंबिक हिंसाचाराची फिर्याद देण्यासाठी मुलीबरोबर हडपसरपोलिस ठाण्यात आलेल्या सासूची माफी मागण्याचा बहाणा करून पाया पडण्यासाठी खाली वाकून जावयाने सासूवरच चाकूहल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार हडपसरपोलिस ठाण्यात घडला. सुदैवाने दक्ष पोलिस उपनिरीक्षकाने जावयाला वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. या सर्व प्रकारात सासूच्या गालाला जखम झाली आहे. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
या प्रकरणी मंगेश महादा तारे (वय २९, रा. वडगावशेरी) या जावयाला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले. या हल्ल्यात पुष्पा दामोदर पालवे (वय ४६, रा. महादेव नगर, मांजरी) या जखमी झाल्या. याबाबत आरोपीचे सासरे दामोदर पालवे यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार शनिवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडला.
अधिक माहितीनुसार, मंगेश तारे आणि पूजा तारे हे दाम्पत्य वडगाव शेरी येथे राहते. मंगेश हा वारंवार चारित्र्यावर संशय घेत असल्याने पूजा या आपल्या आईकडे आल्या होत्या. त्यानंतर त्या तक्रार देण्यासाठी हडपसर पोलिस ठाण्यात आले. तेथे मंगेशही आला होता. त्याने आमचा काही वाद नाही. माझे चुकले असेल तर माफी मागतो, असे म्हणत सासूच्या पाया पडण्याचा बहाणा केला. त्याचवेळी तो खाली वाकला व जर्किनच्या खिशातून भाजी कापण्याचा चाकू काढून सासूवर वार करण्याचा प्रयत्न केला. तो त्यांच्या गालाला लागला. काही समजायच्या आत हे घडले. त्यानंतर तो पुन्हा त्यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न करीत असतानाच तेथे उपस्थित असलेला पोलिस उपनिरीक्षक संतोष गोरे यांनी मंगेशला रोखले व त्याच्या हातातील चाकू काढून घेतला. पोलिस उपनिरीक्षक संतोष गोरे यांनी दाखवलेल्या दक्षतेमुळे पुढील अनर्थ टळला.
कौटुंबिक वाद मिटल्याचा बहाणा करत जावयाने सासूवर लपवून आणलेल्या चाकूने काही कळण्याच्या आत वार केले. आमच्या पोलिस उपनिरीक्षकाने त्याचा हल्ला करण्याचा प्रयत्न हाणून पाडत त्याला ताब्यात घेतले.- अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हडपसर पोलिस ठाणे.