त्याने बॉडी नाही इमेज बिल्ड केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 01:22 AM2018-10-18T01:22:00+5:302018-10-18T01:22:06+5:30
जुबेर शेखची कहाणी : आव्हाने नसतील तर जगण्यात मजा नाही!
पुणे : त्याचे वडील, काका, आजोबा असे सर्वजण पैलवान. कुस्ती तर त्याच्या घरात रंगणारा नेहमीचा खेळ. त्याच्याही मनात कुस्तीपटू होण्याची इच्छा होती. मात्र एकदा झालेल्या दुखापतीमुळे त्याने कुस्तीला कायमचा रामराम ठोकला आणि बॉडी बिल्डिंगचा रस्ता पकडला. पण हा रस्ताही सोपा नव्हता आणि स्वस्तही. तरी त्याने त्यात यश खेचून आणले. ही गोष्ट आहे नगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यातील लहानशा धायगावणे गावाच्या जुबेर शेखची.
आज त्याला प्रतिदिन दीड ते दोन हजार रुपये खर्च येतो. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे तिथून कोणतीही मदत करणे शक्य नाही. त्यामुळे जमेल तशी मेहनत करून तो त्याचा बॉडीबिल्डिंग करतो आहे. सुरुवातीला खर्च परवडत नसल्याने तो सुप्यात एका सामाजिक कार्यकर्त्याच्या घरी राहिला. तिथून पुण्यात आल्यावर त्याने बाउन्सर म्हणूनही काम केले. या दरम्यान पुणे श्री, मिस्टर इंडिया, महाराष्ट्र श्री बक्षिसांवर त्याने नाव कोरले. नुकतेच त्याने मिस्टर एशिया स्पर्धेत कांस्यपदक मिळवले. सध्या तो सकाळी आणि संध्याकाळी मिळून १० तास सराव करतो. जीम ट्रेनर म्हणून काहींना मार्गदर्शनही करतो. मात्र या साऱ्यातूनही त्याला आर्थिक अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आयुष्यात आव्हाने नसतील तर जगण्यात मजा नाही, असे त्याचे मत आहे. विशेषत: ग्रामीण भागातून आलेल्या मुलांना आर्थिक आणि मानसिक आधाराची गरज असते, असे त्याला वाटते.
सध्याचे तरुणांना लागलेले बॉडी बनवण्याचे वेड बघून तो म्हणतो, ‘बॉडी तयार करणे हा सध्या खेळ झाला आहे. योग्य आहार आणि पुरेसा व्यायाम करून जे साध्य करता येते ते महागडे पदार्थ सेवन करून केले जात आहे. या वेडापायी अनेक जण सुदृढ शरीराचा नाश करून घेत आहेत. त्यामुळे बॉडी नाही तर चांगली इमेज बिल्ड करण्याची गरज आहे.’