LOVE SEX AUR DHOKA: मैत्रिणीला घरी बोलावले अन् गुंगीचे औषध देऊन बलात्कार; 3 वर्षापासून लैंगिक शोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 01:48 PM2023-04-05T13:48:55+5:302023-04-05T14:02:54+5:30
घटनेचे चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी देत सतत ३ वर्ष या तरुणीवर लैंगिक अत्याचार
पुणे/किरण शिंदे: पुण्यातील खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 22 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून घरी बोलावले. तिला स्लाईसमध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. या घटनेचे चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी देत सतत तीन वर्ष या तरुणीवर लैंगिक अत्याचार केले जात होते. अखेर पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर तिच्या मित्रासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
दीक्षांत गौतम चव्हाण (रा. रेंजहिल्स, खडकी, पुणे), दुर्योधन भापकर आणि डॉन ( पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. 22 वर्षीय तरुणीने या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी दीक्षांत चव्हाण यांची ओळख होती. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवले. लग्नाची बोलणी करण्यासाठी आई-वडिलांना बोलायचे आहे असे सांगून तिला त्याच्या राहत्या घरी नेले. घरी गेल्यानंतर त्याने स्लाईसमधून गुंगी येण्याचे औषध तिला पिण्यास दिले. हे स्लाईस पिल्यानंतर काही वेळाने फिर्यादी बेशुद्ध झाल्या. त्यानंतर आरोपीने तिच्या अंगावरील संपूर्ण कपडे काढून लैंगिक अत्याचार केले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तयार करून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत लग्न करण्यासाठी दबाव टाकला. इतकच नाही तर हा व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत वेळोवेळी तिला राहत्या घरी बोलवून लैंगिक अत्याचार केले.
दरम्यान आरोपी दुर्योधन भापकर याने देखील "माझ्याकडे तुझा व्हिडिओ आहे" असे सांगून फिर्यादीचा हात पकडून जवळ ओढत विनयभंग केला. तर तिसऱ्या आरोपीने "तू कोणाच्या नादी लागतेस, भापकर कोण आहे हे तुला माहित आहे का, ते तुला संपवून टाकतील" असं म्हणून झालेला विषय कुणाला सांगू नकोस अन्यथा खल्लास करून टाकायला वेळ लागणार नाही असे म्हणत धमकी दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.