पत्नीला भेटायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:11 AM2021-07-30T04:11:18+5:302021-07-30T04:11:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वटपौर्णिमेला महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणारा पत्नीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वटपौर्णिमेला महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणारा पत्नीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. अन् पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात तो अलगद सापडला.
असद ऊर्फ असदुल्ला माशाअल्ला जाफरी ऊर्फ इराणी (वय ४७, रा. पठारे वस्ती, लोणीकाळभोर) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून सोनसाखळीचे ९ आणि मोटारसायकल चोरीचा एक असे १० गुन्हे उघडकीस आणले असून ७ लाख ६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्यात १४ तोळे सोन्याचे दागिने, मोटार सायकल यांचा समावेश आहे.
मागील काही दिवसांपासून शहरात सोनसाखळी चोरीचे प्रकार घडत आहे. त्यामुळे गुन्हे शाखेने सराईत चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, वटपौणिमेला महिलेची सोनसाखळी हिसकावून फरार झालेला सराईत चोरटा पत्नीला भेटण्यासाठी कोंढव्यातील जे के पार्कमध्ये येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले आणि सचिन पवार यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांच्या पथकाने सापळा रचून असदला ताब्यात घेतले. त्याने साथीदाराच्या मदतीने महिलेची सोनसाखळी चोरल्याची कबुली दिली. चौकशी दरम्यान असद आणि साथीदारांनी शहरातील विविध भागात केलेल्या १० गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
सोनसाखळी चोरी केल्यानंतर असद हा कोंढव्यातील सराफ विशाल सोनी याला विक्री करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार गुन्हे शाखेने सराफ सोनी यालाही अटक केली आहे. त्याच्याकडून १४ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे.