गुन्हेगार वडिलांच्या खुनासाठी तो झाला गुन्हेगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 01:48 PM2018-08-14T13:48:38+5:302018-08-14T13:53:00+5:30
वडील मालमत्तेत आपल्या आईला तिच्या वाट्याचा हिस्सा देत नाही म्हणून त्यांचा काटा काढण्यासाठी त्याला पिस्तुल खरेदी करायचे होते़.
पुणे : वडील सराईत गुन्हेगार असले तरी तो सर्वसामान्यांप्रमाणे एका कंपनीत काम करुन आपल्या आईसमवेत स्वतंत्र पण चांगले जीवन जगत होता़. पण कधी कधी विनाशकालीन विपरीत बुध्दी माणसाला रसातळाला न्यायला कारणीभूत ठरते. तसेच काहीसे त्याच्या बाबतीत घडले. आणि तो या घडीला पोलीस कोठडीची हवा खात आहे.
पोलिसांच्या तपासात पुढे आलेले सत्य असे की, वडील मालमत्तेत आपल्या आईला तिच्या वाट्याचा हिस्सा देत नाही म्हणून त्यांचा काटा काढण्यासाठी त्याला पिस्तुल खरेदी करायचे होते़. त्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी त्याने गुन्हेगारीचा काटेरी मार्ग निवडत तीन ठिकाणी घरफोड्या देखील केल्या़. पण याच गुन्ह्यात तो त्याच्या साथीदारासह थेट गुन्हेगार म्हणून कोंढवापोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याला ताब्यात घेतल्यावर चोकशीत ही बाब उघड झाली. मिलिंद रमेश जुनवणे (वय २३, रा. उत्तमनगर, पुणे) व बाळासाहेब रामचंद्र जाधव (वय ४२, रा. शिवणे, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून कोंढवा, सिंहगड रोड येथील चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले असून ५५ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद जुनवणे याचे वडील रमेश जुनवणे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे़ . त्याने शहरात पूर्वी असंख्य घरफोड्या केल्या होत्या़. त्याने दुसरे लग्न केले असून ते वेगळे राहतात़. वडील जरी गुन्हेगार असले तरी मिलिंद हा शिवणे येथील एका कंपनीत काम करुन चांगले जीवन जगत होता़. आईच्या समवेत उत्तमनगरला राहत आहे़ आपल्या आईला मालमत्तेत वाटा देत नसल्यामुळे जुनवणे हा गेल्या काही महिन्यांपासून अस्वस्थ होता़. त्यातूनच त्याने वडिलांचा काटा काढण्याचे ठरविले़. त्यासाठी त्याला पिस्तुल खरेदी करायचे होते़ पिस्तुल घेण्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी त्याने साथीदाराच्या मदतीने कोंढवा, सिंहगड रोडवर तीन ठिकाणी घरफोड्या केल्या़. या गुन्ह्यांचा तपास करताना कोंढवा पोलिसांनी त्यांना पकडले़. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने ही बाब कबुल केली़.
ही कामगिरी उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उप आयुक्त प्रसाद अक्कानवार, वानवडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड, संतोष शिंदे व त्यांच्या पथकाने केली आहे़.