भारत पाकिस्तान मॅचसाठी त्यांनी काढली 1960 च्या कारमधून फेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 07:00 PM2019-06-16T19:00:08+5:302019-06-16T19:02:31+5:30
भारत पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमिवर पुण्यातील क्रिकेटप्रेमीने व्हिंटेज कारमधून सकाळी रॅली काढली.
पुणे : पुणे तिथे काय ऊणे असं म्हंटलं जातं. आज भारत पाकिस्तान या दाेन संघांमध्ये क्रिकेटचा सामना हाेत आहे. भारत पाकिस्तान सामना म्हंटलं की सर्वांच्याच चर्चेचा ताे विषय असताे. अशातच आता भारताचा विजय साजरा करण्यासाठी पुण्यातील क्रिकेटप्रेमी मिलिंद काची यांनी त्यांच्या वडीलांनी भारताने पहिला वर्ल्डकप जिंकला हाेता त्यावेळी ज्या गाडीतून पुण्यात फेरी काढली हाेती, त्याच व्हिंटेज कारमधून मिलिंद काची यांनी आज सकाळी पुण्यात फेरी काढत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे आज फादर्स डे असल्याने काची यांनी आपल्या वडीलांची परंपरा कायम ठेवून त्यांना अनाेखी आदरांजली अर्पण केली.
इंग्लंड येथे हाेत असलेल्या वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान आज मध्ये सामना हाेत आहे. त्यामुळे आज सगळयांचेच डाेळे टिव्हीकडे लागले आहेत. जागाेजागी स्क्रिन्स लावून सामन्याचा आनंद लुटण्यात येत आहे. अशातच पुण्यातील क्रिकेटप्रेमी मिलिंद काची यांनी आपल्या वडीलांच्या 1960 च्या व्हिंटेज कारला सजवून पुण्यात सकाळी फेरी काढली. त्यांच्या वडीलांनी भारताने पहिला वर्ल्डकप जिंकला हाेता, त्यावेळी याच गाडीतून संपूर्ण पुण्यात फेरी काढून आनंद साजरा केली हाेता. त्यांची हीच परंपरा कायम ठेवत आज भारत पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमिवर त्याच गाडीतून फेरी काढत भारत विजयी हाेणार असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच या अनाेख्या उपक्रमामधून त्यांनी त्यांच्या वडीलांना फादर्स डे निमित्त आदरांजली देखील वाहिली आहे.
काळ्या रंगाच्या या व्हिंटेज कारच्या पुढे भारताचा झेंडा लावण्यात आला हाेता. त्याचबराेबर फुग्यांनी कारला सजविण्यात आले हाेते. सकाळी पुण्यातील कॅम्प, पेठा, स्वारगेट या भागात या कारमधून फेरी काढण्यात आली. याबाबत बाेलताना काची म्हणाले, 1960 ची ही कार आहे. भारताने जेव्हा पहिला वर्ल्डकप जिंकला हाेता, तेव्हा वडीलांनी याच गाडीतून पुण्यात फेरी काढली हाेती. त्यावेळी त्यांनी गाडीला सजवले सुद्धा हाेते. ते आता हयात नाहीत. आज वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये मॅच हाेत आहे. त्यातच आज फादर्स डे सुद्धा आहे. त्यामुळे आज गाडी सजवून सकाळी पुण्यात फेरी काढली. रात्री भारताने सामना जिंकल्यानंतरही फेरी काढण्यात येणार आहे. या माध्यामातून वडीलांना आदरांजली वाहण्यात येत आहे.