MPSC परिक्षेतील अपयशानंतर 'तो' माघारी गेलाच नाही; १२ वर्षांनी भेट, आई-वडिलांना अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 07:55 PM2024-02-02T19:55:33+5:302024-02-02T19:56:15+5:30
पोलीस अधिकारी महेश बोळकोटगी यांनी या तरुणाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि त्याची आई वडिलांशी भेट करून दिली...
- किरण शिंदे
पुणे : घरची परिस्थिती बेताची, आई वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायचे. अशात मुलाला स्पर्धा परीक्षेचे वेड लागलं. आई वडिलांचा मात्र त्याच्या पुण्याला जाण्यासाठी विरोध. अशा परिस्थितीत बारा वर्षांपूर्वी कुणालाच काही न सांगता त्याने घर सोडले. पुण्यात भाड्याने खोली घेतली. अर्धवेळ नोकरी करत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. मात्र त्यातही सतत अपयश आल्याने हा तरुण राहत घर सोडून निघून गेला होता. त्यानंतर मुंढवा पोलिसांनी बेपत्ता झालेल्या या तरुणाला शोधून काढले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर हा ही संपूर्ण घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलीस अधिकारी महेश बोळकोटगी यांनी या तरुणाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि त्याची आई वडिलांशी भेट करून दिली.
संतोष कमलाकर पैठणे (वय ३८, मु.पो. काटोदा, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा) असे या तरुणाचे नाव आहे. आपल्या गावातच तो लहान मुलांचे क्लास घ्यायचा. त्याला स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी व्हायचे होते. मात्र घरची परिस्थिती बिकट असल्याने शक्य नव्हते. मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांनी त्याला पुणे शहरात जाण्यास विरोध केला होता. दरम्यान आई-वडिलांचा विरोध असतानाही तो २०१२ मध्ये कुणाला काही न सांगता घरातून निघून गेला. पुण्यात आला, पार्ट टाइम नोकरी करून त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. मधल्या काळात त्यांनी एमपीएससीच्या अनेक परीक्षा दिल्या. मात्र या परीक्षांमध्ये त्याला अपयश आले. या काळात तो मुंढवा परिसरात भाड्याने खोली घेऊन राहत होता.
दरम्यान सतत अपयश येत असल्याने निराश झालेला संतोष १५ ऑक्टोबर रोजी मुंढवा येथील घरातून निघून गेला होता. मुंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी मिसिंग तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलिसांनी मिसिंग तक्रारीची नोंद घेऊन तपास केला आणि संतोष पैठणे याला शोधून काढले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने बारा वर्षांपूर्वी घर सोडल्याचे सांगितले. संपूर्ण घटनेचे गांभीर्य पाहून वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी या मुलाच्या राहत्या गावी सरपंचाशी संपर्क साधला. त्याच्या आईवडिलांशी संपर्क साधून त्यांना ही माहिती दिली. त्यांना पुण्यात बोलावून घेतले आणि बारा वर्षापासून गायब असलेल्या मुलाला त्यांनी कुटुंबीयांच्या ताब्यात सोपवले. बारा वर्षापासून कोणताही संपर्क नसलेला मुलगा पाहून आई-वडिलांच्या डोळ्यात मात्र आनंदाचे अश्रू तराळले. मुंढवा पोलिसांच्या सतर्कतेने दुरावलेल्या मुलगा आणि आई-वडिलांची भेट झाली.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त आर राजा, सहाय्यक आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस कर्मचारी महेश पाठक दत्ता जाधव दिनेश भांदुर्गे योगेश गायकवाड हेमंत पेरणे यांनी केली.