पुण्यात हिऱ्यांचे दागिने व रोख रक्कम असा ४० लाखांना मालकाला घातला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 07:03 PM2018-10-17T19:03:27+5:302018-10-17T19:16:33+5:30
एका हि-यांचे दागिने बनविणा-या मालकाने दाखविलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत हा कर्मचारी २६ लाखांचे दागिणे आणि रोख १३ लाख ५५ हजार रुपये घेवून फरार झाला आहे.
पुणे : मुकुंदनगरमधील सुजय गार्डनमध्ये असलेल्या एका हि-यांचे दागिने बनविणा-या ज्वेलरीमधील विश्वासू कर्मचाऱ्याने मालकाला तब्बल ४० लाख रुपयांचा गंडा घातला आहे. मालकाने दाखविलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत हा कर्मचारी २६ लाखांचे दागिने आणि रोख १३ लाख ५५ हजार रुपये घेवून फरार झाला आहे.
मयुर शहा (वय ४७, रा. शिवशंभोनगर, मिसळ हाऊससमोर, शांताकांता निवास, बिबवेवाडी) असे दागिणे व रक्कम घेवून फरार झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी सराफ व्यावसायिक गिता नहार (वय ५०, रा. मुुकुंदनगर) यांनी स्वारगेट पोलिसांत फिर्याद दिली आहे. याबाबत स्वारगेट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) मच्छिंद्र पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा हा नहार यांच्या सुजय गार्डनमध्ये असलेल्या ज्वलर्समध्ये कामाला होता. मालकाचा अगदी विश्वासू कर्मचारी असल्याने त्यांच्याकडे आॅर्डर दिलेला माल मुंबईतून घेवून येण्याची तसेच मोठ्या आॅर्डर पोहचवणे, आॅर्डरची नोंदणी करण्याचे काम होते. ३० आॅगस्ट रोजी तो पुण्यातून २६ लाखांचे दागिने घेवून मुंबईला गेला. मात्र, त्याने दागिने संबंधित ठिकाणी पोहचवलेॉ नाहीत. उलट मुंबईतून एका ठिकाणाहून चार लाख रुपये घेतले. हा प्रकार नहार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शहा याला फोन केला असता सुरुवातील त्याचा फोन बंद लागला. त्यानंतर त्याच्या मुलाने फोन घेतला आणि वडिलांना बरे नसल्याचे सांगत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले. या सर्व प्रकारामुळे शहा याचा नहार यांना संशय आला. त्यानंतर शहा दागिने आणि रक्कम घेवून फरार झाला आहे. त्यामुळे नहार यांनी याबाबत तक्रार दिली. या प्रकरणाची चौकशी केली असता शहा याने २६ लाखांचे दागिने आणि १३ लाख ५५ हजार रुपये रोख असा एकूण ३९ लाख ५५ हजार रुपयांचा गफला केल्याचे समोर आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. बी. जगदाळे करीत आहेत.
..............
कुटुंबियांना त्रास देवू नका
शहा याने केलेली फसवणूक उघड झाल्याने तो १५ दिवसांपुर्वी नहार यांना चिठ्ठी लिहून पसार झाला आहे. या प्रकरणाचा माझ्या कुटुंबियांशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांना काही त्रास देवू नये, असे त्या चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वीच फिर्यादी यांनी शहा याच्या मुलाचे एका बड्या कॉलेजमध्ये अॅडमिशन करून दिले आहे.