प्रेयसीसाठी त्याने भेदली सुरक्षा, लोहगाव विमानतळावरील घटना : संगणक अभियंत्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 06:36 AM2018-01-23T06:36:40+5:302018-01-23T06:37:10+5:30
सुरक्षारक्षकांना शंका आल्याने त्यांनी त्याचे तिकीट तपासले, तेव्हा ते चक्क बनावट निघाले. लोहगाव विमानतळावर रविवारी दुपारी पावणे दोन वाजता हा प्रकार घडला. विमानतळ पोलिसांनी संगणक अभियंत्याला अटक केली आहे.
विमाननगर/पुणे : कोलकत्याला जाणा-या प्रेयसीला सोडविण्यासाठी तो विमानतळावर आला होता. पण, सुरक्षेच्या कारणास्तव सध्या व्हिजिटर पास देणे बंद केल्याने त्याने बनावट तिकीट तयार करून, प्रेयसीबरोबर वेळ घालविण्यासाठी आत शिरला़ प्रेयसी पुढील सर्व सुरक्षा सोपस्कार पूर्ण करून आत गेली. तेव्हा तो पुन्हा बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला. पण, एकदा आत गेलेल्यांना परत बाहेर येता येत नाही. तेव्हा त्याने आपण प्रवास रद्द करीत आहोत, असे सांगितले़ सुरक्षारक्षकांना शंका आल्याने त्यांनी त्याचे तिकीट तपासले, तेव्हा ते चक्क बनावट निघाले. लोहगाव विमानतळावर रविवारी दुपारी पावणे दोन वाजता हा प्रकार घडला. विमानतळ पोलिसांनी संगणक अभियंत्याला अटक केली आहे.
शुभदीप दास गुप्ता (वय ३५, रा़ पोरवाल रोड, लोहगाव) असे या संगणक अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी इंडिगो कंपनीचे सुरक्षा अधिकारी शुभजित शांतिभूषण शहा (वय ३३, रा़ परांडेनगर, दिघी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: शुभदीप गुप्ता हा पुण्यातील एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत संगणक अभियंता आहे. त्याची प्रेयसी रविवारी दुपारच्या विमानाने लोहगाव विमानतळावरून कोलकत्ता येथे जाणार होती. त्याला त्यावेळी तिला पाठविताना विमानतळावर काही वेळ सोबत घालवायचा होता.
विमानतळाच्या आत केवळ प्रवाशांनाच जाऊ दिले जाते. त्यांना सोडण्यासाठी आलेल्यांना त्यांना बाहेरच सोडावे लागते. आत प्रवेश करण्यासाठी विशिष्ट पासही मिळतो. मात्र, सध्या हा पास देणे बंद केले आहे़ मात्र, गुप्ताला आत जायचे असल्याने त्याने इंडिगो एअरलाइन्सच्या तिकिटामध्ये फेरफार करून त्यात स्वत:चे नाव टाकले. त्यासोबतच त्यात तिच्याच तिकिटाचा पीएनआर क्रमांक टाकून तिकीट तयार केले. प्रवाशांना आत सोडताना पहिल्या गेटवर सुरक्षारक्षक प्रवाशांकडे तिकीट आहे का हे पाहतात़, त्याने या तिकिटाच्या आधारे आत तर प्रवेश केला.
ती विमानात बसून जाईपर्यंत तो विमानतळाच्या आत जवळपास अर्धा तास होता. आत गेलेल्या प्रवाशांना तेथून पुन्हा बाहेर येता येत नाही़ मात्र बाहेर येताना काऊंटरवर त्याने तिकीट दाखवले. आपण प्रवास रद्द करीत असल्याचे कारण सांगितले़ त्यावेळी त्याचे तिकीट तपासले़ तेव्हा तिकिटावरील पीएनआरए नंबर तोच असला, तरी त्यावरील नाव वेगळे होते़ त्यामुळे सुरक्षा अधिका-यांना शंका आली़ त्यांनी चौकशी केल्यावर त्याने आपण प्रेयसीबरोबर वेळ घालविण्यासाठी हे केल्याचे सांगितले़ सुरक्षा अधिका-याने त्याला विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले़ पोलिसांनी त्याला अटक करुन सोमवारी न्यायालयात हजर केले़ न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.