त्याने चौथ्या मजल्यावरून उडी मारली, पुढे जे घडलं ते पाहून सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 01:39 PM2023-10-07T13:39:10+5:302023-10-07T13:44:58+5:30
जीवावर बेतणार हे माहित असूनही पोलिस आणि अग्निशमन जवानांनी केलेल्या धाडसाचं कौतुक सर्वत्र होत आहे...
- पांडुरंग मरगजे
धनकवडी (पुणे) : 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा थरार आंबेगाव येथील सिंहगड कॉलेज परिसरातील नागरिकांनी अनुभवला. पोलिस आणि अग्निशमन जवानांनी आत्महत्येसाठी चौथ्या मजल्यावरून उडी मारलेल्या युवकाला अक्षरशः वरच्यावर अलगद झेलून मृत्यूलाही परत पाठवण्याचा भीम पराक्रम केला. जीवावर बेतणार हे माहित असूनही पोलिस आणि अग्निशमन जवानांनी केलेल्या धाडसाचं कौतुक सर्वत्र होत आहे.
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव विवेक पारखी, (वय २१ वर्षे, रा. मूळगाव नेपाळ) याने गुरुवारी (दि.५) सकाळी आठ वाजता अंबर ग्रीन सोसायटी, सिंहगड कॉलेज कँपस येथील एका चार मजली इमारतीच्या टेरेसवरून खाली उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब परिसरातील लोकांना कळताच त्यांनी पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांना कळवले. बचाव पथक अत्यंत त्वरेने हालचाल करत घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत असंख्य लोक खाली गोळा होऊन हल्लाकल्लोळ करू लागले. सुमारे दीड तास हा प्रकार सुरू होता.
एव्हाना आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विवेक पारखीला वरच्यावर झेलण्यासाठी बचाव पथक जाळे टाकत असतानाच विवेकने थेट टेरेसवरून खाली उडी घेतली. अगदी अखेरच्या क्षणी प्रसंगावधान राखत बचाव पथकाने त्याला वरच्यावर झेलले आणि हे दृश्य पाहणाऱ्यांच्या काळजाचं पार पाणी पाणी झालं. सुदैवाने विवेकचे प्राण वाचले.
त्याने चौथ्या मजल्यावरून उडी मारली, जिवाची बाजी लावून जवानांनी वाचवले प्राण; पुण्यातील घटना#Punepic.twitter.com/tzoXsm2azt
— Lokmat (@lokmat) October 7, 2023
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन अंकित आंबेगाव पठार पोलिस चौकीचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, बिट मार्शल आणि अग्निशामक केंद्रातील कर्मचार्यांनी अक्षरशः स्वतः चा जीव धोक्यात घालून आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा जीव वाचविल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सदर तरुणाने यापूर्वी सुद्धा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.