काहीतरी मोठे करायचे म्हणून निघून गेलेला १३ वर्षांनी नातेवाईकांमध्ये परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:12 AM2021-09-03T04:12:09+5:302021-09-03T04:12:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जीवनात काही तरी भव्य करून दाखवायचे असे त्याचे स्वप्न होते. नातेवाईकांबरोबर झेलम एक्स्प्रेसमधून जात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जीवनात काही तरी भव्य करून दाखवायचे असे त्याचे स्वप्न होते. नातेवाईकांबरोबर झेलम एक्स्प्रेसमधून जात असताना तो पुणे रेल्वे स्थानकावर उतरला व नातेवाईकांना सोडून निघून गेला. त्यानंतर तब्बल १३ वर्षे गेली. आता लोहमार्ग पोलिसांनी घेतलेल्या शोध मोहिमेत हा तरुण सुरतमध्ये काम करीत असल्याचे आढळून आले. तब्बल १३ वर्षांनी दोघे भाऊ एकमेकांना भेटले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
गणेश मन्नुलाल यादव (वय २६, रा. हिनोतीया भोई, ता. बरेला, जि. जबलपूर, मध्य प्रदेश) असे या बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. आता तो ३९ वर्षांचा झाला आहे.
गणेश यादव यांची घरची गरिबी आहे. तो भावाबरोबर ८ एप्रिल २००८ रोजी झेलम एक्स्प्रेसने प्रवास करत असताना पुणे रेल्वे स्थानकावर उतरून बेपत्ता झाला. त्याचा भाऊ सुशीलकुमार यादव याने रेल्वे पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. गणेश यादव याला जीवनात काही तरी मोठे करून दाखवायचे होते. त्यामुळे तो निघून गेला होता. घरची गरिबी आणि अल्प शिक्षण यामुळे त्याने बाळगलेले स्वप्न पूर्ण करू शकला नव्हता. त्यामुळे त्याने घरच्यांशी संपर्क साधला नव्हता.
रेल्वे पोलिसांकडे मिसिंगचे अनेक गुन्हे प्रलंबित आहेत. पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांच्या आदेशानुसार त्यासाठी एक पथक नेमण्यात आले. या पथकाने शोध घेतला असता गणेश यादव हा सुरत येथील आर्यन मित्तल ॲन्ड निप्पो स्टील प्लाँट कन्वहेअर या कंपनीत काम करीत असल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी मध्य प्रदेशातील भावाशी संपर्क करून ही माहिती दिली. त्यानंतर गुरुवारी दोघेही भाऊ पुणे रेल्वे स्थानकावरील लोहमार्ग पोलीस ठाण्यात एकमेकांना तब्बल १३ वर्षांनी भेटले.
पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत क्षीरसागर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मौला सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दीपक काळे, हवालदार गजानन केंगार, पोलीस अंमलदार उदय चिले, संजीव हासे यांनी ही कामगिरी केली.
....
मोबाईल, बँक खात्यावरून पटली ओळख
गणेश यादव हे १३ वर्षांपूर्वी बेपत्ता झाले होते. त्यादरम्यान, त्यांच्यात बराच बदल झाला होता. पोलीस पथकाला तांत्रिक विश्लेषणावरून एक मोबाईल नंबर मिळाला होता. तसेच त्यांच्या बँक खात्यावरून खात्री पटविण्यात आली. गणेश यादव यांनाही घराची ओढ लागली होती. त्यामुळेच त्यांनी काही महिन्यांपूर्वी घरी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता.
- मौला सय्यद, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पुणे