त्याने स्वत:ला घरात कोंडून घेऊन गॅस सिलेंडर सुरू ठेवला! अग्निशमन दलामुळे मोठा अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 06:41 PM2024-10-08T18:41:57+5:302024-10-08T18:43:05+5:30
जवानांनी दरवाजा तोडत आत प्रवेश करून शेगडीचे बटण बंद करुन त्या व्यक्तीला दोरीच्या सहाय्याने सुखरूपपणे बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिले
पुणे: वेळ दुपारी ११ वाजून ४२ मिनिटे. महर्षीनगर, तांबोळी हाऊस या इमारतीत राहणा-या एका व्यक्तीने स्वत:ला घरात कोंडून घेत गॅस सिलेंडर सुरु ठेवला असून, सर्वांना धोका निर्माण झाला असल्याची वर्दी अग्निशमन दल मुख्यालय व गंगाधाम अग्निशमन केंद्र यांना मिळाली. तत्काळ घटनास्थळी दोन अग्निशमन वाहने दाखल झाली. त्या व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडल्याने तो घरातील वस्तू बाहेर फेकत होता. जवानांनी दरवाजा तोडत आत प्रवेश केला. शेगडीचे बटण बंद करुन त्या व्यक्तीला दोरीच्या सहाय्याने सुखरूपपणे बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिले.
या कामगिरीत अग्निशमन अधिकारी सुभाष जाधव, प्रदीप खेडेकर, सुनील नाईकनवरे, प्रशांत गायकर व वाहनचालक हनुमंत कोळी, निलेश कदम तसेच तांडेल राहुल नलावडे आणि जवान विनायक माळी, केतन नरके, अतुल खोपडे, सवाईलाल चव्हाण, सुरेश सूर्यवंशी, धीरज जाधव, हेमंत शिंदे, हर्षद सोनवणे, महेश घटमाळ, साईनाथ पवार, अनिकेत खेडेकर यांनी सहभाग घेतला.
तळमजला अधिक दोन मजली असलेल्या एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील रहिवाशी असलेल्या घरामध्ये एका इसमाचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्याने स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडर सुरु ठेवत शेगडीचे बटण सुरु ठेवले होते. जवानांनी तातडीने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत खाली सुरक्षेच्या दृष्टीने सेफ्टी नेट धरुन ठेवली तर काही जवानांनी वर गच्चीवर जाऊन पयत्न सुरु केले. त्याचवेळी काही जवानांनी स्प्रेडर व घन या उपकरणांचा वापर करुन दरवाजा तोडत आत प्रवेश केला असता सदर इसमाने जवानांना आत येण्यास मज्जाव केला असता तरीदेखील जवानांनी प्रथम शेगडीचे बटण बंद करत गॅस सिलेंडर बाहेर घेत मोठा धोका दूर केला व त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता तो ऐकण्याच्या स्थितीत नसल्याचे जाणवताच पोलिसांची मदत घेत दोरीच्या साह्याने त्याला सुखरुप बाहेर काढत अनर्थ टळला। सुमारे तासाभरात संपुर्ण कामगिरी पार पाडली.