चाकू व बंदुकीच्या धाकाने १० लाख रुपये लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:12 AM2021-09-26T04:12:27+5:302021-09-26T04:12:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोरेगाव भीमा : सणसवाडी (ता. शिरूर) येथील पुणे-अहमदनगर रस्त्याने जाणाऱ्या तिघांना दरोडेखोरांनी चाकू, तसेच बंदुकीसारख्या हत्याराचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव भीमा : सणसवाडी (ता. शिरूर) येथील पुणे-अहमदनगर रस्त्याने जाणाऱ्या तिघांना दरोडेखोरांनी चाकू, तसेच बंदुकीसारख्या हत्याराचा धाक दाखवीत, दमदाटी करीत मारहाण केली. एका तरुणाच्या हातावर चाकूने वार करून तिघांजवळील १० लाख रुपये आणि साहित्य लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभय पंडितराव फपाळ (वय ४०, रा. क्रांतीनगर, ता. जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सणसवाडी (ता. शिरूर) येथील अहमदनगरच्या दिशेने पुणे बाजूकडे अभय फापाळ, संजय सरोदे व अशोक मिसाळ हे काही कामानिमित्ताने दहा लाख रुपये रोख रक्कम घेऊन शुक्रवारी (दि २४) त्यांच्या जवळील कारमधून चालले होते. यावेळी क्रमांक नसलेल्या कारमधून सहा अनोळखी युवकांनी त्या तिघांना थांबवून चाकू, तसेच बंदुकीसारख्या हत्याराचा धाक दाखविला. यावेळी एका युवकाने कारमधील संजय सरोदे यांना हातावर चाकू मारून जखमी केले. तिघांना शिवीगाळ, दमदाटी करीत बळजबरीने गाडीमध्ये बसवून गाडी करंदी फाटा येथील एका अकॅडमीजवळ घेऊन जात गाडीतील दहा लाख रुपये रोख रक्कम, तसेच तिघांचे मोबाइल पाकीट, कागदपत्रे, असा १० लाख ९३ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास करीत मोटारीतून फरार झाले. शिक्रापूर पोलिसांनी सहा इसमांवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन आतकरे करीत आहेत.