धर्माच्या भिंती ओलांडत त्यांनी केले हजारोंचे अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:12 AM2021-04-21T04:12:38+5:302021-04-21T04:12:38+5:30
ही संस्था मागील वर्षभरापासून हे काम करीत आहे. जावेद खान हे त्याचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या टीममध्ये ३२ स्वयंसेवक काम ...
ही संस्था मागील वर्षभरापासून हे काम करीत आहे. जावेद खान हे त्याचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या टीममध्ये ३२ स्वयंसेवक काम करीत आहेत. यामध्ये २० वर्षांच्या कार्यकर्त्यापासून ६४ वर्षांपर्यंतच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यांनी यासाठी व्हाॅट्सॲप ग्रुप केला असून, त्या माध्यमातून कामाची रचना केली जाते. टीम लीडर प्रत्येक वेळी स्वतः हजर राहून लक्ष देतात.
संस्थेने केलेले अंत्यविधी : १२००
-----
मूलनिवासी मुस्लिम मंच
शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून ही संस्था काम करीत आहे. पुरोगामी मुस्लिम कार्यकर्ते अंजुम इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. कोरोनाच्या पहिल्या मृत्यूपासून आजवर हे काम अव्याहतपणे सुरू आहे. संस्थेच्या टीममध्ये ५० स्वयंसेवक काम करीत आहेत. पुण्याच्या सर्व भागात सर्वधर्मीय अंत्यविधी करण्यासाठी टीम नेमण्यात आलेल्या आहेत.
संस्थेने केलेले अंत्यविधी : ११३५
-----
दि मुस्लिम फाऊंडेशन
कोरोना काळात पहिल्या लाटेपासूनच फाऊंडेशन काम करीत आहे. याकाळात मृतदेह कोणत्या धर्माचा आहे हे न पाहता केवळ माणुसकीच्या नात्याने अंत्यविधीच्या कामासाठी पालिकेकडून परवानगी मिळविली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात ही सेवा देण्यासाठी ७० जणांच्या टीमची विभागणी करण्यात आली. अनेकजण हे काम करण्यासाठी पुढे येत आहेत. रफिक शेख आणि खालिद शेख हे दोघे कोरोनाच्या सर्वधर्मीय अंत्यविधींच्या टीमचे नेतृत्व करतात.
संस्थेने केलेले अंत्यविधी : १२५०
-----
अल्फा आमेगा ख्रिश्चन महासंघ
मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून ही संस्था ख्रिश्चन समाजातील कोरोना मृतांच्या अंत्यविधीचे काम करीत आहे. पुणे शहर अध्यक्ष अँथनी वाकडे आणि त्यांची सहा जणांची टीम हे काम करीत आहे. महासंघाने आजवर हिंदू आणि विशेषत: ख्रिश्चन समाजातील मृतांवर अंत्यसंस्कार केले आहेत.
संस्थेने केलेले अंत्यविधी : १८१
-----
ख्रिश्चन चॅरिटेबल ट्रस्ट
सुरुवातीच्या काळात मृत्यू झालेल्या ख्रिश्चन फादरच्या मृतदेहाचे दहन करण्यात आले. त्यावेळी धार्मिक प्रथा दफन करण्याची असल्याने संस्थेने पालिकेकडे दफनविधीची परवानगी मागितली. सुरुवातीला संस्थेच्या सगाई राजेश नायर या स्वतः महिला असूनही पीपीई किट घालून दफनविधी करू लागल्या. हळूहळू त्यांची टीम वाढली. त्यांचे राजेश नायर हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. या संस्थेने गेल्या वर्षभरात सर्वधर्मीय मृतदेहांचे अंत्यविधी केले आहेत.
संस्थेने केलेले अंत्यविधी : ११००
-----
गेल्या काही दिवसात मृतदेहांची संख्या वाढल्याने या संस्थांच्या कामावर ताण आला आहे. मात्र, हे कार्यकर्ते न थकता एक दिवसात पाच ते आठ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहेत. हे कार्यकर्ते पैसे न घेता सेवाभावी वृत्तीने काम करीत आहेत. पालिकेकडून त्यांना पीपीई किट आणि सुरक्षा साधने पुरविली जातात.
----