एका झाडासाठी त्यांनी वृक्ष प्राधिकरणातच मांडला ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 06:58 PM2018-07-21T18:58:04+5:302018-07-21T19:02:51+5:30
रस्त्यावरील झाडाचा त्रास हाेत असल्याने ते छाटून देण्याची मागणी करत पुण्यातील एका व्यावसायिकाने थेट महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणात ठिय्या मांडला.
पुणे : सातत्याने अर्ज करुनही इमारतीसमाेरील पदपथावरील झाड न काढल्याने व्यावसायिकाने शनिवारी थेट पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणातच ठिय्या मांडला. विक्रम खन्ना असे या व्यावसायिकाचे नाव असून जाेपर्यंत कर्मचारी इमारतीसमाेरील झाड काढत नाहीत, ताेपर्यंत प्राधिकरणातून हलणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी केला हाेता, अखेर पालिकेने फांद्या छाटण्याचे लेखी अाश्वासन दिल्यानंतर त्यांनी अापले अांदाेलन मागे घेतले.
विक्रम खन्ना यांची लक्ष्मी रस्त्यावर इमारत अाहे. या इमारतीच्या समाेर एक उंबराचे झाड अाहे. ते झाड काढावे असा अर्ज त्यांनी 3 जानेवारी 2018 राेजी पालिकेकडे केला हाेता. झाड काढणे शक्य नसेल तर इमारतीला अडथळा ठरणाऱ्या फांद्यातरी छाटून द्याव्यात अशी त्यांची मागणी हाेती. परंतु महापालिकेने झाड काढण्याबाबत कुठलिही कारवाई केली नसल्याचे किंवा त्यांच्या अर्जाबाबत कुठलाही निर्णय कळवला नसल्याचे खन्ना यांचे म्हणणे अाहे. त्या एका झाडाच्या बदल्यात इतर ठिकाणी झाडे लावण्याची त्यांनी तयारी दर्शवली अाहे. परंतु त्यांच्या अर्जावर पालिकेचे अधिकारी टाेलवाटाेलवी करत असल्याचे त्यांचे म्हणणे अाहे. झाड पाडणे शक्य नसल्यास त्याच्या फांद्यातरी छाटून देण्यात द्याव्यात अशी त्यांची मागणी अाहे. त्याचबराेबर सात महिन्यापूर्वी केलेल्या अर्जावर काय कारवाई झाली याची माहिती मिळावी यासाठी त्यांनी शनिवारी महापालिकेच्या वृक्षप्राधिकरणात थेट ठिय्याच मांडला.
याबाबत बाेलताना खन्ना म्हणाले, सात महिन्यापूर्वी मी झाड काढण्यासाठी अर्ज केला हाेता. त्यावर काय कारवाई केली याचे उत्तर मला पालिकेने दिले नाही. त्यानंतरही अनेक अर्ज करुनही कुठलेही ठाेस उत्तर देण्यात अाले नाही. नेहमी टाेलवाटाेलवीची उत्तरे देण्यात अाली. झाड कापणे शक्य नसेल तर फांद्या छाटून द्याव्यात अशी मी मागणी केली. परंतु पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्याकडेही दुर्लक्ष करण्यात येत अाहे. तसेच खासगी व्यक्तीकडून फांद्या कापण्यास सांगण्यात येत अाहे. वास्तविक ते झाड पालिकेच्या मालकीचे असून त्याच्या फांद्या छाटून देणे ही पालिकेची जबाबदारी अाहे.