' त्याने ' प्रामाणिकपणा दाखवत बँकेला परत केले नजरचुकीने आलेले पन्नास हजार रुपये...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 21:07 IST2019-12-31T19:39:51+5:302019-12-31T21:07:49+5:30
बँक कर्मचाऱ्याच्या नजरचुकीने देण्यात आले जास्तीचे पाचशे रुपयांच्या नोटांचे २ बंडल

' त्याने ' प्रामाणिकपणा दाखवत बँकेला परत केले नजरचुकीने आलेले पन्नास हजार रुपये...
पुणे : सध्या आजूबाजूला आर्थिक फसवणुकीचे अनेक गुन्हे उघडकीस येत असतात. कधी फसवणुकीचे हे प्रकार जवळच्या नातेवाईक तर कधी अज्ञात व्यक्तींकडून घडवून आणतात. पण समाजात जरी फसवणुकीच्या घटना वाढत असल्यातरी प्रामाणिकता देखील तितकीच टिकून आहे. खराडी येथील बँक ऑफ महाराष्ट्रकडून नजरचुकीने आले ज्यादाचे पैसे त्याने बँकेला परत केले. हा प्रामाणिकपणा पाहून बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले..
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योग शिक्षक मंगेश ठोमके नेहमीप्रमाणे आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँकेत गेला होता . त्याला पन्नास हजार काढायचे होते. पण नजरचुकीने त्याला बँक कर्मचाऱ्याकडून नजरचुकीने पाचशेच्या नोटांचे २ बंडल देण्यात आले. मंगेशला वाटले कि २५ -२५ हजारांचे दोन बंडल आहे. त्याने आहे तसे घेत बॅगेत ठेवले. त्याने घरी आल्यावर देखील पैसे मोजले नाही. ते पुन्हा दुसऱ्या बँकेत ज्यावेळी पैसे भरण्यासाठी गेले तेव्हा त्याला बँक ऑफ महाराष्ट्र बँकेकडून पन्नास हजारऐवजी एक लाख रुपये आल्याचे लक्षात आले. त्याने ज्यादा आलेले रुपये बँकेत जाऊन जमा केले. त्याच्या प्रामाणिकपणाचे बँकेच्या कर्मचारी व अधिकार वर्गाने कौतुक केले.मंगेश हे ठिकठिकाणी योगाचे क्लासेस घेत असतात. यापूर्वीही घडलेल्या प्रसंगात मंगेशने प्रामाणिकपणा जपला आहे.
मंगेश म्हणाला, मी पैसे काढण्यासाठी बँकेत गेलो होतो. तेव्हा बँक कर्मचाऱ्याच्या नजरचुकीने जास्तीचे पाचशे रुपयांच्या नोटांचे २ बंडल देण्यात आले. मला वाटले २५ - २५ हजार रुपयांचे ते २ बंडल असतील पण प्रत्यक्षात ते एक लाख रुपये निघाले. तात्काळ पैसे परत करण्यासाठी बँकेत गेलो. त्यावेळी तिथे देखील पैसे कुणाला जास्तीचे पैसे गेले यासंबंधी धावपळ तपासणी सुरु होती. जेव्हा त्यांना माझ्याकडे नजरचुकीने ज्यादाचे पैसे आल्याचे सांगितले तेव्हा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना गहिवरून आले. त्यांनी मंगेश यांना कौतुकाचे पत्र दिले.