इसे बोलते है " विलपॉवर "..कॅन्सरवर मात करून ‘तो ’ धावतोय महामॅरेथॉन!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 12:34 PM2020-02-14T12:34:06+5:302020-02-14T12:37:26+5:30
वयाच्या सहाव्या वर्षी त्याला ब्रेन ट्युमर असल्याचे निदान झाले. २०११ पासून उपचार सुरू आहे.
पुणे : कॅन्सर हा दुर्धर आजार आहे, असे मनात पण आणायचे नाही. आपल्यात आत्मविश्वास असला पाहिजे, तर आपण कॅन्सरवर मात करून उभे राहू शकतो. घाबरून जायचे नाही. विलपॉवर स्ट्राँग ठेवायची. ह्या भावना आहेत वयाच्या सहाव्या वर्षी झालेल्या कॅन्सरशी झुंज दिलेल्या औरंगाबादचा पराग लिगदे याची. तो रविवारी ( दि.१६) पुण्यात होणाºया ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये धावण्यासाठी सज्ज आहे. अवघ्या १५ वर्षांचा पराग आतापर्यंत १३ मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी झालेला आहे.
परागला वयाच्या सहाव्या वर्षी ब्रेन ट्युमर असल्याचे निदान झाले. २०११ पाासून उपचार सुरू आहे. आतापर्यंत ७० केमोथेरपी घेतल्या आहेत. दर आठ दिवसाला केमोथेरपी घ्यावी लागत होती. त्याच्या शरीराची सारखी आग व्हायची. आई-वडिलांना मांडीवर घेऊन बसावे लागायचे दोन वर्षे रुग्णशय्येवर झोपून होता. स्वत:ला उठता येत नव्हते. धरून उठवावे लागत होते. स्वत:ला चालतापण येत नव्हते. मी ७ ते ८ महिने बोलत पण नव्हता. शस्त्रक्रिया झाल्यावर फरक पडत गेला. ७ ते ८ महिने फिजिओथेरपी करावी लागली. त्यानंतर हळूहळू चालायला लागला. वडील श्रीनिवास आणि आई वैशाली यांनी उपचारात कोणतीही कसर ठेवली नाही. हलाखीची परिस्थिती असतानाही त्याच्यासाठी जीवाचे रान केले. त्यामुळे परागलाही बळ मिळतगेले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी परागने धावणे सुरू केले. मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ लागला. लोकमतच्या सर्व शहरातील मॅरेथॉनमध्ये तो धावला आहेच. नुकताच मुंबई मॅरेथॉनमध्येही धावून आला. विशेष म्हणजे त्याचे आई-बाबाही सोबत धावतात. आई-बाबा माझ्या सोबत धावण्याची / चालण्याची मॅरेथॉन असली की माझ्यासोबत धावतात. मी आतापर्यंत १२ ते १३ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे.
.......
मॅरेथॉनने दिले आत्मबळ...
मॅरेथॉनमध्ये धावण्याने परागला आत्मबळ दिले आहे. तो म्हणतो, आई-बाबांच्या चेहºयावर हसू पाहण्यासाठी प्रत्येक स्पर्धेत भाग घेणार आहे. कॅन्सर हा दुर्धर आजार आहे, असे मनात पण आणायचे नाही. आपल्यात आत्मविश्वास असला पाहिजे, तर आपण कॅन्सरवर मात करून उभे राहू शकतो. घाबरून जायचे नाही. विलपॉवर स्ट्राँग ठेवायची. मी इतरांसारखे आयुष्य जगू शकतो, हे पाहिल्यावर आईने मला मिठी मारली. तिच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू येत होते. म्हणूनच पुण्यातील ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये धावण्यासाठीही तो सज्ज झाला आहे.