Vanraj Andekar Murder Case: तो खाली बसला अन् बचावला; वनराज आंदेकरांचा भाऊ शिवमही होता टार्गेटवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 06:08 PM2024-09-04T18:08:56+5:302024-09-04T18:09:31+5:30
तेरा हल्लेखोरांपैकी एकाने प्रथम शिवमवर गोळी झाडली, परंतु शिवम खाली बसल्यानं तो बचावला
पुणे: रविवारी रात्री पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा निर्घृण खून करण्यात आलाय. नाना पेठेतील आंदेकर चौकात वनराज आंदेकर चुलत भाऊ शिवमसोबत ते थांबले होते. यावेळी शिवम याच्यावर सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवम थोडक्यात बचावल्याचे बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर यांनी फिर्यादीत म्हटलं आहे.
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. नाना पेठेसारखा गजबजलेला भागात रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. एरवी मित्रांच्या गराड्यात असणारा वनराज रविवारी मात्र शिवमसोबत थांबले होता. जवळच त्याचं घर होतं. आणि घरापासून चालत चालत ते मुख्य रस्त्या लागत असणाऱ्या चौकात आले. हल्लेखोर त्याची वाट पाहत दबा धरूनच बसले होते. मोकळ्या जागेत वनराज आंदेकर येताच ६ दुचाकी त्याच्या दिशेने धावल्या. हल्लेखोरांपैकी एकाने प्रथम शिवमवर गोळी झाडली. परंतु, शिवम खाली बसल्यानं तो बचावला. त्यानंतर सुरुवातीला एकाने आंदेकरांवर गोळ्या झाडल्या. एकापाठोपाठ एक अशा पाच गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या हल्ल्याने वनराज आंदेकर गडबडले. त्यांनी पळून जाण्याचाही प्रयत्न केला. ते दोघे पळून जात असताना वनराज यांच्या बहीण संजीवनी आणि मेहुणा जयंत कोमकर बाल्कनीतून 'मारा, मारा, त्यांना सोडू नका,' अशी चिथावणी देत होते. तेव्हा आरोपींपैकी एका जण शिवमच्या अंगावर धावून गेला होता. मात्र, शिवम तिथून पळून गेला. हल्लेखोरासमोर वनराज यांचा मात्र टिकाव लागला नाही आणि तो त्यांच्या हाती लागला. आणि त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्यानेही वार केले. रक्ताच्या थारोळ्यात त्याला पडलेले पाहून नंतर मारेकर्यांनी पळ काढला.
रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी जयंत लक्ष्मण कोमकर आणि गणेश लक्ष्मण कोमकर या दोघांना अटक केली होती. तसेच वनराज यांची बहीण संजीवनी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर संशयित म्हणून सोमनाथ गायकवाडही पोलिसांच्या ताब्यात आहे. कालच पोलिसांनी १३ हल्लेखोरांना रायगड जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे.