‘त्याने’ ४ महिन्यांत चाेरली ४० वाहने; मुलगा अद्यापही सापडेना? पोलिसांवर नामुष्कीची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 12:55 PM2024-09-20T12:55:02+5:302024-09-20T12:55:24+5:30
मुलाला फक्त मानलेली आई असून तो कधी कधी तिला भेटायला येत असतो, तसेच तो मोबाइल वापरत नसल्याने लोकेशन ट्रेस करणे अवघड होऊन बसले आहे
सचिन सिंग
वारजे : त्याला आई ना बाप. एका मानलेल्या आईकडेच त्याचे येणे-जाणे. मात्र माेठा अवगुणी. केवळ माैजमजेसाठी माेठ्या शिताफीने वाहने चाेरणे त्याचा छंद. हाैस भागली वा त्यातील इंधन संपले की ते वाहन साेडून देणे आणि दुसऱ्या वाहनाची चाेरी करणे हे त्याच्यासाठी नित्याचे झाले. अशा पद्धतीने त्याने आतापर्यंत तब्बल ४० वाहने चाेरली असून, विविध पाेलिस ठाण्यांमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. अलीकडेच त्याने एका ज्येष्ठाची दुचाकी चाेरली असून, ‘कानून’के लंबे हात अद्याप त्याच्यापर्यंत पाेहाेचू शकेल नाहीत. त्यामुळे पाेलिसांनाच या चाेरट्याने जेरीस आणले असल्याचे दिसून येत आहे.
येथील आरएमडी कॉलेज परिसरातून एका ज्येष्ठ नागरिकाची दुचाकी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चोरीला गेली. त्याच वेळेस भोर तालुक्यातील किकवी गावात महामार्गावरील सचिन पवार यांच्या हॉटेलच्या दारासमोर उभी असलेली एक व्हॅगनर मोटारदेखील पहाटे ५ वाजेच्या सुमारास चोरीला गेली. हॉटेलच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये एक किशोरवयीन मुलगा हॉटेलचा दरवाजा उचकटून आत जाऊन गल्ल्यातील पैसे व ड्रावरमधील सगळ्या चाव्या घेऊन बाहेर येत असल्याचे व कार चोरून निघून जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. तेथे जाण्यासाठी त्या मुलाने जी दुचाकी वापरली त्या वाहन क्रमांकाच्या नोंदीवरून ती गाडी पुण्यातील वारजे भागातील असल्याचे दिसून आले.
पवार यांच्यासह तेथील चार-पाच जणांनी येऊन वारजे पोलिसांकडे चौकशी केली असता सदर चोरीला गेलेले दुचाकी मालकदेखील पोलिस चौकीत तक्रार देण्यास आले असल्याने एकमेकांची भेट झाली. पवार यांनी ज्येष्ठ नागरिकास तुमची गाडी आमच्या हॉटेलच्या पार्किंगमध्ये सुरक्षित उभी असल्याबाबत कळवले. पवार यांची मोटारदेखील तिसऱ्या दिवशी पानशेतजवळ रस्त्याच्या कडेला उभी असल्याची नंतर आढळून आले. या दोन्ही चोऱ्या वारजेतील किशोरवयीन आरोपीने केल्याचे निष्पन्न झाले.
तपासामध्ये या आरोपीने वारजे, राजगड, अलंकार, सिंहगडसह इतरही पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अशा प्रकारचे वाहने चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. तो चोरी केलेली वाहने दोन-चार दिवस पेट्रोल आहे तोपर्यंत फिरवतो. पेट्रोल संपलं की ती गाडी रस्त्याच्या कडेला व्यवस्थित पार्क करून सोडून देतो, अशी त्याची कार्यपद्धती आहे. पण यात नाहक वाहनमालक व पोलिस प्रशासन भरडले जातात.
माेबाइल वापरतच नाही; लाेकेशन मिळेना!
या मुलाला पालक कोणीच नाहीत. फक्त एक मानलेली आई आहे. तिलाच भेटायला तो कधी कधी येत असतो व काहीसा सायको आहे. पोलिसांकडे इतकीच माहिती आहे. मोबाइल तो वापरत नाही त्यामुळे त्याचा लोकेशन ट्रेस करणे अवघड होऊन बसते.
बालसुधारगृहातून गायब
मागच्या आठवड्यात गुन्हे शाखेने त्याचा ताबा घेतला होता. वारजे पोलिसांनी तो ताबा घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली असता कोर्टाने त्याची रवानगी बारामतीच्या बालसुधारगृहात केली होती. शनिवारी पोलिस त्याला बारामती येथील बालसुधारगृहात सोडून आले होते. सोमवारी तो येथील बालसुधारगृहातूनदेखील पळून गेल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
वाहन चोरी झाल्यावर त्याबाबत तक्रार नोंदवून घेणे हे आमचे कामच आहे. सदर विधिसंघर्षित बालकावर पोलिसांचे लक्ष असून, एप्रिल महिन्यात उघडकीस आलेल्या गुन्ह्यांचे आरोपपत्र आम्ही दाखल करत आहोत. - मनोज शेडगे, पोलिस निरीक्षक, वारजे पोलिस ठाणे