‘तो’ सीसीटीव्ही नसलेल्या भागात जायचा अन् चोरी करून पसार व्हायचा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 10:08 AM2023-07-13T10:08:07+5:302023-07-13T10:08:20+5:30
आरोपीकडून १८ गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी १७ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त
पुणे : मागील काही महिन्यांमध्ये पुणे ग्रामीण आणि अहमदनगर जिल्ह्यातील दुर्गम भागात दरोडा आणि जबरी चोरीचे प्रमाण वाढले होते. या गुन्ह्यांचा शोध घेत पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टोळीच्या म्होरक्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून १८ गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी १७ लाख ६४ हजार रुपयांचे २९४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
दरोडे व जबरी चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची ६ ते ७ पथके तयार करण्यात आली होती. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे अजय उल्हास्या काळे (रा. कडुस ता. पारनेर, जि. अहमदनगर) याला ४ जुलैला तर गणेश सुरेश भोसले (वय २८ रा. वाळुंज, ता.आष्टी पारनेर, जि. बीड. सध्या रा. निघोज, ता. पारनेर) याला मंगळवारी शिरुरमधून आणि सराफ व्यावसायिक किरण भाऊसाहेब बेद्रे (वय ३३, रा. मु. पो. वाळुंज, ता. नगर) याला नगरमधून अटक केली आहे. पावल्या उर्फ देवा कैलास काळे, तुषार उर्फ विशाल कैलास काळे, शरद कैलास काळे यांची नावे गुन्ह्यात निष्पन्न झाली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १८ गुन्ह्यांमध्ये ७ घरफोडी, ५ दरोडे, ४ जबरी चोरी आणि २ चोरी या गुन्ह्यांचा समावेश आहे. आरोपींची अंगझडती केली असता, गणेश भोसले याच्याकडून गुन्ह्यातील ८ ग्रॅम सोन्याचे दागिने, चोरलेली दुचाकी, घड्याळ, ब्रेसलेट असा मुद्देमाल जप्त केला.
मोडस ऑपरेंडी
एकांकी वस्तीमध्ये, जेथे आजूबाजूला घरे किंवा सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, अशा ठिकाणी सदर गुन्हे घडले आहेत. कुठेतरी लांब अंतरावर गाडी लावून, एखाद्या शेतातून पळ काढून आरोपी फरार व्हायचे. तसेच चोरी केलेल्या वाहनांचा वापर करून आरोपींनी गुन्हे केल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींनासुद्धा पोलिसांच्या तपासाचे मार्ग माहीत असतात
जसे पोलिसांना आरोपींची मोडस ऑपरेंडी माहीत असते. तशीच आरोपींनासुद्धा पोलिसांच्या तपासाचे मार्ग माहीत असतात. म्हणून या आरोपींनी पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यांतील तीन आरोपींना पकडणे शक्य झाले. उर्वरित आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. - अंकित गोयल, पोलिस अधीक्षक, पुणे