‘तो’फक्त रिक्षाचालकांचेच चोरायचा ‘मोबाईल’; यामागचे ‘कारण’ ऐकून पोलीस देखील झाले ‘हैराण’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 08:18 PM2020-08-25T20:18:41+5:302020-08-25T20:19:23+5:30
त्यानंतर सर्व रिक्षाचालक त्याच्या दृष्टीने गुन्हेगार ठरले...
पुणे : कॅम्प परिसरात मोबाईल चोरीच्या घटना वाढू लागल्या होत्या. त्यात प्रामुख्याने रिक्षाचालकांचेच मोबाईल चोरीला जाण्याचे प्रमाण जास्तच होते. या चोराची पद्धत साधारण सारखी दिसत होती. सीसीटीव्हीचे फुटेज आणि बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरुन, लष्कर पोलिसांनी एका तरुणाला पकडले़. त्याच्याकडे अनेक मोबाईल सापडले. रिक्षाचालकांचेच मोबाईल का चोरले असे विचारल्यावर त्याने दिलेले कारण ऐकून पोलीस देखील हैराण झाले. प्रेमभंगातून तो चोरटा बनला होता...
आसिफ उर्फ बोहरा अरिफभाई शेख (वय ३७, मुळ रा. अहमदाबाद) असे त्याचे नाव आहे. याबाबत लष्कर पोलिसांनी सांगितले की, आसिफ शेख हा सुमारे पावणे दोन वर्षांपूर्वी घरातील लोकांच्या विरोध पत्करुन एका तरुणीबरोबर लग्न करण्यासाठी पळून पुण्यात आला होता. मात्र, त्याच्या प्रेयसीचे दुसऱ्या एका रिक्षाचालकावर प्रेम संबंध जुळले. आसिफचे २० ते २५ हजार रुपये घेऊन पुण्यात लग्नासाठी ते आले असताना ती एक दिवस संधी साधून रिक्षाचालकासोबत पळून गेली. त्याचा आसिफला मोठा धक्का बसला. त्यानंतर सर्व रिक्षाचालक त्याच्या दृष्टीने गुन्हेगार ठरले. त्यातूनच रिक्षाचालकांना त्रास देण्यासाठी तो त्यांचे मोबाईल चोरु लागला.
................................................................
'अशी' होती त्यांची मोबाईल चोरीची स्टाईल
आसिफ मोबाईल असलेल्या चालकाच्या रिक्षामध्ये बसत. एखादे गर्दीच्या ठिकाणी तो रिक्षा घेऊन जात असे. तेथे गेल्यावर आपला मोबाईल विसरला. येथे मित्राकडे आलो आहे, त्याला बोलावून घेऊन पैसे देतो, असे सांगून तो रिक्षाचालकाचा मोबाईल घेत असत. त्यावरुन तो फोन लावल्याचा बहाणा करीत व बोलत रिक्षापासून काही अंतर चालत जाऊन गर्दीतून पळून जात असे. रिक्षाचालक मित्राला घेऊन येतो, असे वाटून त्याची वाट पहात थांबत. अशा प्रकारे आसिफने कॅम्प, वानवडी, कोंढवा, येरवडा भागात अनेक रिक्षाचालकांचे मोबाईल चोरले आहेत. ५० ते ६० मोबाईल चोरल्याचे तो सांगत आहे. त्यापैकी काही मोबाईल त्याने मुंबईत विकले असून त्याचा तपास करण्यासाठी पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले आहे.