Pune: कॅनडात नोकरी लागल्याचे सांगून तो विमानतळावर गेला अन् अडकला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 11:49 AM2021-12-11T11:49:23+5:302021-12-11T13:05:46+5:30
आई वडिलांना दाखविण्यासाठी त्याने कॅनडात नोकरी लागल्याचे सांगितले...!
पुणे : नोकरी गेल्याने त्याला अमेरिकेहून घरी यावे लागले होते. आई वडिलांना दाखविण्यासाठी त्याने कॅनडात नोकरी लागल्याचे सांगितले. बनावट तिकीट व व्हिसाही तयार केला. आपण खरेच कॅनडाला जात असल्याचे दाखविण्यासाठी त्याने लोहगावविमानतळावर प्रवेशही केला. तेथून बाहेर पडत असताना सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आल्याने तो अडकला. बनावट तिकीट व कॅनडाचा बनावट व्हिसा तर करुन त्याचा गैरवापर करणार्या एका ३० वर्षाच्या तरुणाला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी लोहगाव विमानतळावरील शिफ्ट इन्चार्ज अरविंदकुमार सिंग यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध येथे राहणार्या एका ३० वर्षाच्या तरुणाची २०१९ मध्ये नोकरी गेली. त्यामुळे त्याला अमेरिकेहून परत पुण्याला यावे लागले होते. त्यानंतर काही महिन्यातच लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे त्याला कोठेही नोकरी न मिळाल्याने गेली २ वर्षे तो घरीच होता. आपण आई वडिलांवर बोझ बनलो आहोत, अशी बोच त्याच्या मनात लागून राहिली होती. त्यामुळे त्याने घरी कॉम्प्युटरवर कॅनडाचा बनावट व्हिसा तयार केला. तसेच पुणे ते दिल्ली व दिल्ली ते व्हॅनकुवर (कॅनडा) असे एअर इंडियाचे बनावट तिकीटही तयार केले. आपल्या आईवडिलांना त्याने आपल्याला नोकरी लागल्याचे व आपण कॅनडाला जात असल्याचे सांगितले. त्यामुळे आई वडिलांना आनंद झाला.
९ डिसेबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास या तरुणाचे आईवडिल त्याला सोडण्यासाठी विमानतळावर आले. त्यामुळे त्याला विमानतळामध्ये प्रवेश करावा लागला. दुपारी साडेचार ते सायंकाळी सव्वासात वाजेपर्यंत तो विमानतळाच्या लॉबीतच थांबून राहिला. त्यानंतर तो पुन्हा आत प्रवेश करतात, तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करु लागला. तेव्हा सुरक्षा रक्षकांना संशयास्पद वाटले. त्यांनी चौकशी केल्यावर त्याच्याकडील तिकीट व व्हिसा बनावट निघाला. त्यानंतर त्यांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले.
अटक झाली तरीही मुलगा वाचल्याचे समाधान
नोकरी नसल्याने अस्वस्थ असलेल्या या तरुणाने आईवडिलांना बरे वाटावे, म्हणून हा सर्व उद्योग केला असल्याचे पोलिसांना समजल्यावर त्यांनाही त्याचे दु:ख वाटले. त्यांनी विमानतळाबाहेर पडल्यावर काय करणार होता, असे विचारल्यावर या तरुणाने नक्की काही ठरविले नाही. मित्रांकडे जाणार होतो, असे सांगितले. या तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याने पुढे काही बरे वाईट केल्याचे समजण्यापेक्षा तो पकडला गेल्याने आता डोळ्यासमोर तरी राहिल, याचेच त्याच्या आईवडिलांना समाधान आहे.