वाढदिवसाच्या बहाण्याने सोनसाखळी परिधान करायचा; कर्मचाऱ्याचे लक्ष नसल्याची संधी साधून पसार व्हायचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 12:38 IST2024-12-15T12:38:10+5:302024-12-15T12:38:26+5:30

चोराविरुद्ध सोनसाखळी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले असून ३ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे

He would wear a gold chain on the pretext of his birthday he would take advantage of the employee's inattention to escape. | वाढदिवसाच्या बहाण्याने सोनसाखळी परिधान करायचा; कर्मचाऱ्याचे लक्ष नसल्याची संधी साधून पसार व्हायचा

वाढदिवसाच्या बहाण्याने सोनसाखळी परिधान करायचा; कर्मचाऱ्याचे लक्ष नसल्याची संधी साधून पसार व्हायचा

पुणे : वाढदिवसानिमित्त सोनसाखळी खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून तो सोनसाखळी चोरून पसार व्हायचा. अखेर हा चोर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याच्याकडून तीन लाख ६४ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. चोराविरुद्ध सोनसाखळी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

कपिल जयराम चव्हाण (वय ३९, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सिंहगड रस्ता भागातील धायरी परिसरातील एका सराफी पेढीतून खरेदीच्या बहाण्याने चोरट्याने सोनसाखळी चोरून नेल्याची घटना घडली होती. चव्हाण वाढदिवसानिमित्त सोनसाखळी खरेदी करायची आहे, अशी बतावणी करून सराफी पेढीत शिरायचा. पेढीतील आरशासमोर थांबून तो सोनसाखळी परिधान करायचा. कर्मचाऱ्याचे लक्ष नसल्याची संधी साधून सराफी पेढीसमोर लावलेल्या दुचाकीवरून तो पसार व्हायचा.

सिंहगड रस्ता पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता. त्यांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. चव्हाणने खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याचा माग काढण्यास सुरुवात केली. चव्हाण कोथरूड भागात येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाईंगडे, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, संजय शिंदे, अण्णा केकाण, उत्तम तारू, पंकज देशमुख, देवा चव्हाण यांनी ही कारवाई केली.

Web Title: He would wear a gold chain on the pretext of his birthday he would take advantage of the employee's inattention to escape.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.