Video: जय श्रीराम लिहून थेट रिक्षाच बनवली अन् पुण्याहून निघाला रामाच्या दर्शनाला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 02:43 PM2024-01-16T14:43:07+5:302024-01-16T14:44:43+5:30
अयोध्येला गेल्यावर प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन माझ्या रिक्षात योगी आदित्यनाथ यांनी बसावे, रिक्षाचालकाची अपेक्षा
शगुप्ता शेख
पुणे: अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा येत्या २२ जानेवारीला करण्यात येणार आहे. हा उत्साह संपूर्ण जगभरात साजरा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील एका रिक्षा चालकाने चक्क प्रभू श्रीरामांच्या भेटीसाठी रिक्षा तयार केली आहे. त्यातून तो रिक्षावाला थेट अयोध्येला जाणार आहे. त्यामुळे या राम भक्त रिक्षावाल्याची चर्चा आता होऊ लागली आहे.
पुण्यातील कॅम्प परिसरात राहणारा राहुल नायकु नावाचा तरुण. अस्सल राम भक्त. अयोध्येमध्ये राम मंदिराची उभारणी सुरू असल्यापासून त्याची प्रभू श्रीरामाना भेटण्याची ओढ वाढू लागली आहे. अखेर त्याची ही इच्छा येत्या २२ तारखेला पूर्ण होणार असून त्याने अयोध्येला जाण्यासाठी संपूर्ण रिक्षाचं राम मय केली आहे. रिक्षाच्या वर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, त्याच्या खालो खाल प्रभू श्रीरामांचे चित्र. संपूर्ण रिक्षाला जय श्रीराम या जपाने लिहिलेले आहे. चलो अयोध्या असा संदेश देत हा रिक्षावाला अयोध्येला जाण्यासाठी निघालेला आहे.
राहुल नायकुने रिक्षा खास अयोध्येला जाण्यासाठी बनवून घेतली असून त्यासाठी त्याला साडे तीन ते चार लाखांचा खर्च आला आहे. त्या रिक्षाला फ्रंट आणि बॅक कॅमेरा लावले आहेत. याशिवाय एसी देखील रिक्षात लावलेला असून वायफाय देखील देण्यात आले आहे. अयोध्येला जाण्यासाठी हा रिक्षावाला आज निघणार आहे. प्रभू श्रीरामांच्या भेटीची आस लागली असून अयोध्येला गेल्यावर प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन माझ्या रिक्षात योगी आदित्यनाथ यांनी बसावे अशी अपेक्षा यावेळी रिक्षा चालकाने व्यक्त केली आहे.