आरोग्य विभागप्रमुखपद राज्य सरकारकडून भरणार
By admin | Published: April 16, 2017 04:10 AM2017-04-16T04:10:24+5:302017-04-16T04:10:24+5:30
महापालिकेचे आरोग्य विभागप्रमुखपद राज्य सरकारकडून भरण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्य आरोग्य विभागाकडे पत्र पाठविण्यात आले
पुणे : महापालिकेचे आरोग्य विभागप्रमुखपद राज्य सरकारकडून भरण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्य आरोग्य विभागाकडे पत्र पाठविण्यात आले असून या पदासाठीचे सर्व निकष पूर्ण करणारा अधिकारी द्यावा, असे त्यात नमूद करण्यात आले असल्याची माहिती मिळाली.
महापालिकेचे विद्यमान प्रभारी आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी येत्या ३० एप्रिलला महापालिकेच्या सेवेतून निवृत्त होत आहेत. यापूर्वी या पदावर महापालिकेच्याच आरोग्य विभागातील डॉक्टरांची पदोन्नती करण्यात येत होती. या पदासाठी विशेष निकष आहेत. ते पूर्ण करणारे डॉक्टर पालिकेच्या सेवेत असतानाही प्रशासनाच्या राज्य सरकारकडून हे पद भरण्याच्या प्रयत्नांबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पदासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. संघटनेच्या माध्यमातून याविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते.
महापालिकेचे आरोग्य विभागाची व्याप्ती बरीच मोठी आहे. महापालिकेचे मोठे दवाखाने, औषधोपचार केंद्रे तर आहेतच; शिवाय काही वर्षांपासून स्वाइन फ्लू व अन्य साथीच्या आजारांमुळे या पदावरील कामांचे गांभीर्यही वाढले आहे. मात्र, त्यामुळेच या पदाचे कामकाज कायम वादग्रस्त होत आहे. अशा स्थितीत सरकारी अधिकारी या पदावर आला, तर संपूर्ण विभागात शिस्त वाढीला लागेल व प्रभावी काम होईल, अशा अपेक्षेने सरकारी अधिकाऱ्याचा आग्रह प्रशासनाकडून धरण्यात येत आहे. (प्रतिनिधी)