हेड अॅन्ड नेक कर्करोगाच्या उपचाराला ‘बळ’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 09:10 PM2018-09-14T21:10:48+5:302018-09-14T21:18:51+5:30
राज्य शासनाने तीन महाविद्यालयांना एकुण २ कोटी ६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे रुग्णांना योग्यप्रकारे उपचार करणे शक्य होणार आहे.
पुणे : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘हेड अॅन्ड नेक’ (डोके आणि घसा) कर्करोगावर उपचारासाठी अत्याधुनिक उपकरणे मिळणार आहेत. त्यासाठी राज्य शासनाने तीन महाविद्यालयांना एकुण २ कोटी ६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे रुग्णांना योग्यप्रकारे उपचार करणे शक्य होणार आहे.
पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयासह मुंबईतील ग्रॅन्ट महाविद्यालय आणि नागपुर शासकीय महाविद्यालयांचा यामध्ये समावेश आहे. या रुग्णालयांमध्ये हेड अॅन्ड नेक कर्करोगावर उपचार केले जातात. त्यामध्ये तंबाखुजन्य पदार्थांमुळे जीभ, गाल, घसा, तोंडाला होणाऱ्या कर्करोगाचा समावेश आहे. मात्र, या रुग्णालयांमध्ये सध्या काही उपकरणे अत्यंत जुनी आहेत. तर काही उपकरणे महागडी असल्याने अद्यापही उपलब्ध झाली नव्हती. त्यामुळे कर्करोगावर परिपुर्ण उपचार करणे शक्य होत नव्हते. याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाकडून काही दिवसांपासून संबंधित शासकीय महाविद्यालयांमधील आवश्यक उपकरणांची माहिती संकलित केली जात होती. त्यानुसार संबंधित महाविद्यालयांकडून गरजेनुसार उपकरणांची माहिती दिली. त्याप्रमाणे विभागाने सर्व यंत्रसामुग्रीची खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यासाठी एकुण २ कोटी ६ लाख ३७९ रुपये मंजुर करण्यात आले आहेत.
पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्वाधिक ९८ लाख ४९ हजार रुपये मंजुर करण्यात आले आहेत. त्यातून विविध प्रकारची १२ उपकरणे खरेदी केली जाणार आहेत. ग्रॅन्ट महाविद्यालयाला आठ उपकरणांसाठी ५१ लाख ३९ हजार ३७९ तर नागपुर महाविद्यालयाला नऊ उपकरणांसाठी ५६ लाख ४० हजार रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. ही यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी मंजुरी मिळाल्याने संबंधित रुग्णालयांमधील कर्करोगावरील उपचार परिपुर्ण होणार आहेत. यापुर्वी या उपचारांना अनेक मर्यादा येत होत्या. संबंधित उपकरणांअभावी रुग्णांना खासगी रुग्णालयांची वाट धरावी लागत होती. परिणामी, त्यांच्यावरील खर्चाचा बोजाही वाढत होता. आता या उपकरणांची खरेदी झाल्यानंतर कर्करोगाच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
---------------