पुणे शहरातील भिंतींवरचे ‘ कमळ ’ ठरणार प्रशासनाची डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 09:25 PM2019-03-12T21:25:29+5:302019-03-13T13:29:44+5:30
गेल्या तीन महिन्यांत सुशोभिकरणाच्या नावाखाली सत्ताधारी भाजपाच्या नगरससेवकांनी मोठ्या प्रमाणात शहरातील भिंतींवर कमळ फुलवले आहे.
पुणे: लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे महापालिका प्रशासनाकडून शहरातील सर्व राजकीय पक्षांचे फ्लेक्स, झेंडे, पोस्टर, बॅनर काढण्याची कारवाई सुरु झाली आहे. यामध्ये गेल्या तीन महिन्यांत सुशोभिकरणाच्या नावाखाली सत्ताधारी भाजपाच्या नगरससेवकांनी मोठ्या प्रमाणात शहरातील भिंतींवर कमळ फुलवले आहे. परंतु आता आचासंहितेमुळे भाजपचे चिन्ह कमळ झाकणे व रंगवणे प्रशासनाची मोठी डोकेदुखी ठरणार आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०१८-१९ अंतर्गत शहरामध्ये सुशोभिकरण करण्यात आले आहे. यामध्ये शहरातील सर्व उड्डाणपुल, शाळा, रुग्णालय,रस्ते आदी विविध ठिकाणी भिंती रंगविण्यात आल्या आहेत. यासाठी महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. परंतु या भिंती रंगविताना सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात पक्षाची जाहिरात करत भिंतीवर सर्वत्र कमळ फुलवली आहेत. या भिंती रंगविण्यावरून महापालिकेच्या मुख्य सभेत विरोधकांनी भाजपवर टिका देखील केली आहे. तसचे केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा निकाल देखील नुकताच लागला असून, यामध्ये महापालिकेच्या स्वच्छतेचा दर्जा चांगला घसरला आहे. याला देखील सत्ताधारी भाजपने शहरातील भिंतींवर काढलेले कमळ कारणीभूत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
परंतु आता आचारसंहित जाहीर झाली असून, महापालिका प्रशासनाला या भिंतींवर रंगवलेली कमळांची फुले रंग देऊन पुसून टाकावी लागणार आहे. यासाठी प्रशासनाला किमान आठ-दहा दिवसांचा वेळ लागणार असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली.
-----------------
दोन दिवसांत ५ हजार ८०८ बॅनर, फ्लेक्स, झेंडे काढले
लोकसभा निवडणुकीसाठी १० मार्च रोजी सायंकाळ पासून आचारसंहिता लागू झाली आहे. शहरामध्ये आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून दोन दिवसांपासून शहरातील बॅनर, फ्लेक्स, झेंड काढण्याची कारवाई सुरु झाली आहे. यामध्ये आता पर्यंत ५ हजार ८०८ बॅनर, फ्लेक्स, झेंडे काढण्यात आले आहेत.