दौंडचे टोलनाके ठरतायत डोकेदुखी
By admin | Published: May 30, 2015 11:00 PM2015-05-30T23:00:59+5:302015-05-30T23:00:59+5:30
दौंड शहरात नगर मोरीजवळ आणि भीमा नदी परिसरातील रस्त्यावर असे दोन टोलनाके आहेत. साधारणत: या दोन्ही टोलनाक्यांवर बऱ्यापैकी कर्मचारी कामाला आहेत.
दौंड : दौंड शहरात नगर मोरीजवळ आणि भीमा नदी परिसरातील रस्त्यावर असे दोन टोलनाके आहेत. साधारणत: या दोन्ही टोलनाक्यांवर बऱ्यापैकी कर्मचारी कामाला आहेत. १ जूनपासून एसटी आणि छोट्या वाहनांना राज्य शासनाने टोलमुक्त केल्याने याचा आर्थिक परिणाम टोलनाका चालकांवर होणार असल्याचे दौंड येथील टोल नाक्याचे व्यवस्थापक चेतन कनोजिया यांनी सांगितले.
मुंबई येथील सहकार ग्लोबल कंपनीच्या अधिपत्याखाली दोन्ही टोलनाक्यावर वसुली केली जाते. साधारणत: १0 वर्षांच्या जवळपास दोन्ही टोलनाके कार्यरत आहेत. परंतु त्या तुलनेत वाहन चालकांना कोणतीही सुविधा अद्याप मिळालेली नाही. दौंडच्या रेल्वे उड्डाण पूलावरुन येण्याचा टोल घेतला जात असल्याचे समजते. मात्र या पूलावर रात्रीच्या वेळेला अंधाराचे साम्राज्य असते. अनेकवेळा विद्युत पथदिवे बसविण्याची मागणी करुन देखील पथदिवे बसविलेले नाहीत. वास्तविक पाहता उड्डाण पूलावर पथदिवे लावण्याचे काम टोलनाका व्यवस्थापनाचे आहे.
तसेच या टोलनाक्याच्या परिसरातील रस्त्याची देखील दयनीय अवस्था आहे. तर सातत्याने रस्त्यावर खड्डे असून एकूणच धुळीचे साम्राज्य आहे. दौंड - अहमदनगर रोडवर भीमा नदीच्या पात्राअलीकडे टोलनाका आहे. या टोलनाक्याचा तर वाहन चालकांना काडीमात्र फायदा नाही. परंतु टोल वसूल केला जातो. हा टोल पास झाल्यानंतर नदीवर छोटासा वाहतूक पूल आहे. या पूलावरुन दुचाकी वाहन जर गेले तरी पूलास हादरे बसतात.
एकंदरीतच सदरचा पूल कधी कोसळेल याची शाश्वती नाही अशा परिस्थितीत टोल का वसूल केला जातो हा प्रश्न वाहन चालकांपुढे आहे. दोन्ही टोलनाक्यावर सोयसुविधा उपलब्ध नाहीच.
४वाहन चालकांसाठी टोलनाक्याचे काय नियम आहेत. याचा सूचना फलक देखील नाही. फक्त कोणत्या वाहनाने किती पैसे द्यायचे हा घेवाणीचा फलक दिसतो. एकंदरीत दोन्ही टोलनाके सुविधा देण्यात असमर्थ आहेत. तेव्हा शासनाने हे दोन्ही टोलनाके कायमस्वरुपी बंद करावेत, अशी मागणी दौंडच्या नागरिकांसह प्रवाशी वर्गातून पुढे आली आहे.
दुहेरी टोल भरावा लागतो.
अहमदनगरकडून सिद्धटेककडे जाण्यासाठी भाविक येत असतात. तेव्हा भीमा नदीजवळील टोलवर पैसे दिल्यानंतर या टोलपासून सुमारे तीन किलोमीटरच्या अंतरावर दौंड शहरात जाण्यासाठी नगर मोरीजवळ दुसरा टोल नाका आहे. याठिकाणी देखील भाविकांसह अन्य प्रवाशांना टोल भरावा लागत असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले असुन हा एक प्रकारे वाहन चालकांवर विशेषत: सिद्धीविनायकाच्या भाविकांवर अन्यायच आहे. याचाही विचार शासनाने करावा, बऱ्याचदा गाडीचे नंबर पाहून टोल वसूल केला जातो. परराज्यातील गाडी असल्यास टोल नाक्यावाल्यांचे चांगले फावते. बऱ्याचदा परराज्यातील वाहन चालकांवर दादागिरी केली जात असल्याच्या घटना ही घडलेल्या आहेत.
बारामती टोलनाक्यावर कार, जीप, एसटीला सवलत
बारामती : राज्य सरकारने सवलत दिलेल्या टोलमध्ये बारामती शहरातील टोल नाक्यांचा समावेश आहे.आज मध्यरात्रीपासून शहरातील पाच टोल नाक्यांवर कार,जीप,एसटी बस गाड्यांना टोलमधून सुट देण्यात येणार आहे. शहरातील भिगवण रस्ता, पाटस रस्ता, मोरगाव रस्ता, नीरा रस्ता, इंदापूर रस्त्यावर पाच ठिकाणी टोल आकारणी सुरू होती.तसेच शहरात प्रवेश करताना आणि बाहेर पडताना दुहेरी टोलचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत होता.या दुहेरी टोल बाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती.‘लोकमत’ने टोल बाबत वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले होते.नागरिकांच्या नाराजीला वाचा फोडली होती. अखेर आता बारामतीकरांना टोल पासून कायमची सवलत मिळाली आहे. या योजनेचे १३२ कोटी रूपये मुल्यांकन आहे.१९ वर्षं ४ महिने पथकर वसूलीसाठी कंत्राट कालावधी होता.१५ डिसेंबर २००५ साली शहरातील पाच मार्गांवर टोल वसुली सुरू करण्यात आली होती. सुरूवातीला पाच वर्षं रस्ते विकास महामंडळाकडे ही वसूली होती.त्यानंतर बारामती टोलवेज प्रा.ली.या ठेकेदार कंपनीकडे टोलवसूली देण्यात आली आहे.टोल माध्यमातून जवळपास २७ कोटी रूपये टोल वसूल झाल्याचा अंदाज आहे.