मुख्याध्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण
By admin | Published: June 27, 2015 03:36 AM2015-06-27T03:36:57+5:302015-06-27T03:36:57+5:30
बाबुर्डी (ता. बारामती) येथील श्री भैरवनाथ विद्यालयातील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्याला मुख्याध्यापकाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी (दि. २५) दुपारी घडला
सुपे : बाबुर्डी (ता. बारामती) येथील श्री भैरवनाथ विद्यालयातील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्याला मुख्याध्यापकाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी (दि. २५) दुपारी घडला. मुख्याध्यापक एम. के. खोमणे यांच्यावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मुख्याध्यापकाची त्वरित बदली करण्याची मागणी केली आहे; अन्यथा शाळा बंद आंदोलन केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
तेजस कुंडलीक लव्हे असे मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. येथील विद्यालय कै. वसंतराव पवार शिक्षण प्रसारक मंडळाचे आहे. या शाळेतील एम. के. खोमणे या मुख्याध्यापकांनी गुरुवारी दुपारी मुले वर्गात गोंधळ घालत असल्याच्या कारणावरून इयत्ता ५वी तील तेजस लव्हे या विद्यार्थ्याला लाकडी फुटपट्टीने बेदम मारहाण केली. त्या मुलाच्या दोन्ही पायाच्या पिंढऱ्याला मारल्याने काळे-निळे व्रण पडले आहेत.
शाळेतील इतर कोणत्याही मुलांना मुख्यध्यापकाने मारले नाही. मात्र, अपवाद वगळता तेजसला जी मारहाण झाली ती अशोभनीय आहे, अशी माहिती तेजसचे पालक कुंडलिक लव्हे यांनी दिली.
मागील आठवड्यातच शाळा सुरू झाल्या. त्यावेळी नव्याने इयत्ता ५वीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत शिक्षकांनी गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. याला एक आठवडा होत नाही, तोच शाळेतील मुख्याध्यापकाने नव्याने शाळेत दाखला झालेल्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली. हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे येथील मुख्याध्यापकाची त्वरित बदली करावी; अन्यथा शाळा बंद आंदोलन केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. (वार्ताहर)